
पुरंदरमधील मुलांचं मोठं यश;11 विद्यार्थ्यांची एकाचवेळी पोलीस दलात निवड
सासवड : पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी अभ्यासिका सुरु झाल्या असून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुकर झाला आहे. परिणामी पुरंदरच्या तालुक्यातील युवकांची प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या पोलीस सेवा भरती प्रक्रियेतून पुरंदरमधील तब्बल अकरा विद्यार्थ्यांची एकाच वेळी पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सिद्धी दादासो बोरकर (राजुरी), सिद्धार्थ शरद इनामके आणि सुमित अशोक म्हेत्रे (सासवड), किरण महादेव भोसले (भोसलेवाडी), साहिल श्रीपती पवार (पवारवाडी), प्रतीक्षा राजेंद्र जगताप (मांडकी) ओंकार पांडुरंग वचकल (वीर), प्रताप बाळासो बालवडकर (भिवरी) अविनाश अनंता कारकूड (पानवडी), रोहन अंकुश जाधव (माळशिरस) आणि प्रतिक नानासो खैरे (खैरेवाडी, कोळविहीरे),अशी पुणे शहर पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तसेच भिवडी येथील योगेश पांडुरंग भिंताडे यांची मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात परिवर्तन
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सासवड येथील परिवर्तन अभ्यासिकेचे प्रमुख सागर भगत यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, २६ जानेवारी २०१८ मध्ये पुरंदरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका सुरु केली. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास २५० पेक्षा जास्त अधिकारी घडवले आहेत. २०१८ मध्ये लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात खऱ्या अर्थाने परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील युवक युवतींना शासकीय सेवेत नोकरी मिळावी, त्यांच्या कुटुंबाचा आणि गावाचा उद्धार व्हावा यासाठी कायम कार्यरत राहील.
प्रशासकीय सेवेसाठी अभ्यास करणे शक्य
आम्ही यापूर्वी विविध कामासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेल्यानंतर अनेक अधिकारी पाहायला मिळत होते, आपल्या भागात अशा संस्था नसल्याने अनेकांना आपल्या स्वप्नावर मुरड घालावी लागत होती. मात्र आता आमच्या ग्रामीण भागात अशा संस्था सुरु झाल्याने आम्हाला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच बाहेर न जाता स्थानिक पातळीवर आम्हाला प्रशासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. त्यातूनच आमचे यश दिसत आहे, अशी प्रतिक्रिया नव्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.