
माळेगाव कारखान्याच्या 70 व्या गळीत हंगामाला प्रारंभ; 13 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
माळेगाव : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते १२ ऑक्टोबर रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. हंगाम सुरू झाल्यानंतर कारखान्यातून उत्पादित झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे ‘पहिली लक्ष्मी’ म्हणून विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने दिवंगत अजित पवार यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला वंदन करण्यात आले. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या सहकार्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
चालू हंगामात कारखान्याने १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊसाबरोबरच गेटकेन ऊस उपलब्ध करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यातील यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून, गाळप प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
अडचणींवर मात करून उद्दिष्ट साध्य करू : नितीन शेंडे
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे म्हणाले, “यंदाचा गळीत हंगाम काहीसा अडचणींचा असला, तरी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि संचालक मंडळाच्या एकजुटीच्या बळावर सर्व अडचणींवर मात केली जाईल. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने निश्चित केलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकदिलाने प्रयत्न करतील.”
पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा ! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
कारखान्याला अधिकाधिक ऊस उपलब्ध झाल्यास गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच साखर उत्पादन, सहवीज निर्मिती आणि बगॅस उत्पादनालाही चालना मिळणार आहे. त्यातून कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हितालाही फायदा होणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.
शेतकरीहिताला प्राधान्य
गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी ऊस तोडणी, वाहतूक आणि गाळप प्रक्रियेसह कारखान्याच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यावर आणून त्याचे गाळप करण्याबरोबरच कारखान्याची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर असलेला विश्वास कायम ठेवत यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष नितीन शेंडे, संचालक गणेश खलाटे, विजय तावरे, शिवराजराजे जाधवराव, रतनकुमार भोसले, सतीश फाळके, ॲड. मच्छिंद्र मुलमुले, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र रणवरे, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे, चीफ केमिस्ट श्रीकांत पाटील, स्टोअर कीपर सुरेश देवकाते, गोडाऊन प्रमुख लक्ष्मण जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.