
माळेगाव कारखान्यावर स्वाभिमानीचं आंदोलन! राजू शेट्टी आक्रमक; नेमकं मागण्या काय?
गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ केलेली नाही. दुसरीकडे, ऊस उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून साखरेच्या स्थिर दराचा फटका शेतकरी आणि कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखान्यांनी गाळप बंद ठेवून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.
साखरेची विक्री आणि गाळप रोखा
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, यंदा देशातील साखरेचे उत्पादन मागणीच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेला चांगला दर मिळण्याची संधी आहे. केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना रास्त भाव मिळण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. योग्य दर दिला नाही, तर कारखान्यांनी गाळप सुरू करू नये आणि गोदामांतील साखरेची विक्रीही थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्या इथेनॉलला प्रतिलिटर सुमारे ५७ रुपये दर मिळत असून तो ७० रुपये करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर पेट्रोलचे दर वाढतात; मात्र इथेनॉलच्या दरात अपेक्षित वाढ होत नाही. मागील आर्थिक वर्षात तेल कंपन्यांनी दीड लाख कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा दावाही त्यांनी केला. यंदा कारखाने लवकर सुरू झाल्याने उसाचे वजन आणि साखर उतारा घटण्याची शक्यता असून, ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टींसमोरच शाब्दिक चकमक
आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र ढवाण आणि निरावागज परिसरातील काही शेतकऱ्यांमध्ये राजू शेट्टी यांच्यासमोरच जोरदार शाब्दिक चकमक झाली. वाद वाढून परस्परांना आव्हान देण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला.
“यापूर्वी आंदोलन करून सरकारला दूधदरवाढ करण्यास भाग पाडले. आता ऊस उत्पादकांनी एकजूट दाखवत गाळप बंद आंदोलनाला पाठिंबा द्यावा. मागण्या न्याय्य असून केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्याची हीच वेळ आहे. ऊस वाचवण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असूनही धरणांतून पाणी सोडले नाही, तर पाण्यासाठीही तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. — राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Ans: साखरेची एमएसपी प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन केले.
Ans: साखर कारखाने बंद आंदोलनाला पाठिंबा देत ऊस गाळप बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांनी केली.
Ans: ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.