
अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश
रांजणी/ रमेश जाधव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात गेले अनेक दिवस अस्वस्थ असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात आढळराव पाटील केव्हाही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आढळराव पाटील पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतत असल्याने आंबेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील विशेषतः आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळू शकते .
आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंबेगाव तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. आढळराव पाटील हे यापूर्वी दीर्घकाळ शिवसेनेत कार्यरत होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे निश्चित झाले आहे.
आढळराव यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आढळराव पाटील यांच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या दोन – तीन दिवसात मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला येणार पुन्हा बळकटी
दरम्यान गेल्या दोन वर्षापासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आढळराव पाटील यांचे वळसे पाटील यांच्याबाबतचे राजकिय आणि वैयक्तिक संबंध चांगले आहेत. परंतु आढळरावांना वळसे पाटील यांच्या सभोवतालच्या काही ठराविक मंडळींकडून जाणीवपूर्वक सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळे आणि आढळराव पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याची भूमिका काही कार्यकर्ते घेत असल्याने आढळरावांना राष्ट्रवादी पक्षात थांबण्याचा वीट आल्याने अखेर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आढळराव पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेला पुन्हा बळकटी निर्माण करतील, अशी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.