
गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील ‘गणेशम फेज २’ सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची थरारक घटना शुक्रवारी घडली आहे. आगीचे वृत्त समजताच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी अत्यंत तत्परता दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केले. या घटनेत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका रूममध्ये दोन लहान मुली अडकल्या होत्या; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत दोन लहान मुले अडकल्याचे समजताच जवानांनी जीवाची बाजी लावत तातडीने बचावकार्य सुरू केले आणि त्या दोन्ही चिमुरड्यांची सुखरूप सुटका केली. याप्रसंगी नगरसेविका अनिता काटे, नगरसेविका कुंदा भिसे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
सध्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवले असून, परिस्थिती आटोक्यात आणली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे प्राथमिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली सतर्कता आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेले धाडस व वेगवान हालचालींमुळे संभाव्य जीवितहानी टळण्यास मोठी मदत झाली आहे. प्रशासनाकडून आणि अग्निशमन दलाकडून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
कळव्यात ५ झोपड्यांना भीषण आग
कळवा येथील खारेगाव परिसरात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पाच झोपड्यांना शुक्रवारी सकाळी आग लागली. या आगीत एका मिनी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झोपड्यांचे नुकसान झाले. आग लागली त्यावेळी सर्व झोपड्यामध्ये कोणीही नव्हते. यामुळे जीवितहानी टळली. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने सुमारे तासाभरात आग पूर्णपणे विझविण्यात आली. कळवा येथील खारेगाव परिसरातील सहयोग सोसायटीच्या मागील बाजूस, खारेगाव पुलाजवळ तात्पुरत्या स्वरूपात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्यांना सकाळी ९.२३ वाजता आग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवाहरबाग अग्निशमन दलाच्या जवानांनी एका अग्निशमन वाहनासह दोन बचाव वाहनांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू केले. स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे १०.३० वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली.