
बीआयएसचा परवानाधारक मेळावा उत्साहात; हायड्रोजन इंधन गुणवत्ता मानकांवर केले मंथन
पुणे : भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणे शाखा कार्यालयातर्फे परवानाधारक मेळावा (लायसन्सी मीट) तसेच नुकत्याच प्रकाशित झालेल्या हायड्रोजन इंधन गुणवत्ता, उत्पादन विनिर्देश या भारतीय मानकावर आधारित ‘मानक मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध उद्योग, उद्योग संघटना, शासकीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित क्षेत्रांतील १२० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात बीआयएस पुणे शाखा कार्यालयाचे संचालक व प्रमुख कौशलेन्द्र कुमार यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी मानकीकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मानक ब्यूरोच्या, पश्चिम क्षेत्राचे उपमहानिदेशक व्ही. गोपीनाथ होते. त्यांनी भारतीय उद्योगांनी नवोन्मेष, गुणवत्ता वृद्धी आणि मानकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत जागतिक स्पर्धात्मकतेसाठी दर्जात्मक मानकांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व सहाय्य यंत्रणांची माहिती दिली.
तांत्रिक सत्रांमध्ये एमआयटी वर्ल्ड पीसयुनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रत्नदीप जोशी यांनी हरित हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाविषयी माहिती दिली. तर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक संदीप रैरीकर यांनी हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान आणि शाश्वत गतिशीलतेसाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. या चर्चासत्रातून सहभागीना हायड्रोजन इंधन गुणवत्तेसाठी नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या भारतीय मानकाची सविस्तर माहिती मिळाली. याशिवाय शाश्वत आणि सक्षम औद्योगिक विकासासाठी नवोपक्रम, मानकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
हे सुद्धा वाचा : साखर उद्योग अडचणीत; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे ‘ही’ मोठी मागणी
कार्यक्रमात बीआयएस परवाना प्राप्त करण्याची प्रक्रिया, अनिवार्य प्रमाणनाच्या कक्षेत समाविष्ट उत्पादनांचे प्रमाणन, उत्पादकांसाठी इन-हाऊस चाचणी सुविधांबाबतच्या सवलती, एमएसएमई उत्पादकांसाठी परवाना शुल्कातील सवलती तसेच बीआयएसच्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.