
संकटाच्या काळात ‘एएफएमएस’चे वैद्यकीय कवच; ‘एअरबॉर्न हॉस्पिटल’ची तत्पर सेवा
पुणे / सुनयना सोनवणे : युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य मानवी संकटांच्या वेळी तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) सज्ज आहे. कमी वेळेत कुठेही उभारता येणाऱ्या ‘एअरबॉर्न हॉस्पिटल’च्या माध्यमातून देशासह परदेशातील आपत्तीग्रस्त भागांतही वैद्यकीय मदत पोहोचविली जात आहे. तुर्की, म्यानमार, श्रीलंका आणि अलीकडील व्हेनेझुएला येथील मदतमोहिमांमध्ये या यंत्रणेची कार्यक्षमता दिसून आली, अशी माहिती एएफएमएसच्या महासंचालक सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी दिली.
एएफएमसीमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सरीन यांनी एएफएमएसच्या आपत्कालीन वैद्यकीय क्षमतेची माहिती दिली. व्हेनेझुएलातील आपत्तीनंतर भारतीय लष्कराच्या ६० पॅरा फील्ड हॉस्पिटलने तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने तात्पुरती वैद्यकीय सुविधा उभारली. जखमींवर प्राथमिक उपचारांसह शस्त्रक्रिया आणि आवश्यक उपचार करण्यात आले. या कामगिरीचे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने कौतुक केले.
कोरिया मोहिमेपासून ६० पॅरा फील्ड हॉस्पिटलने विविध मानवतावादी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘कधीही, कुठेही आणि कोणासाठीही’ सेवा देणे ही या युनिटची ओळख बनली असल्याचे सरीन यांनी सांगितले.
भविष्यातील वैद्यकीय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. शांततेच्या काळात सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधुनिक उपचार दिले जातात, तर सीमावर्ती आणि संघर्षग्रस्त भागात वाहून नेता येणाऱ्या उपकरणांच्या सहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अवकाश वैद्यक संशोधनात भारताची आघाडी
भारतीय हवाई दलाच्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन मेडिसिनमध्ये अंतराळवीरांच्या आरोग्याशी संबंधित संशोधन सुरू आहे. आयसीएमआरच्या सहकार्याने एव्हिएशन सायकॉलॉजीसाठी प्रगत संशोधन केंद्र कार्यरत असून, अंतराळातील किरणोत्सर्ग, आरोग्य परिणाम आणि प्रशिक्षण यावर अभ्यास केला जात आहे. तीन वर्षांचा ‘एमडी एव्हिएशन मेडिसिन’ अभ्यासक्रम राबविणारा भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे सरीन यांनी सांगितले.
एएफएमएसमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर
लष्करी वैद्यकीय सेवेत महिला अधिकाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय असून, २०३० पर्यंत एएफएमएसमधील महिलांचा सहभाग २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सरीन यांनी सांगितले. सेवेत स्त्री-पुरुषांना समान संधी असून, निवड आणि प्रगतीमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.