मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी साहित्य संमेलन पुरस्कार जाहीर
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, पुण्यात पहिले जागतिक मराठी संमेलन होत आहे. हे सांगताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ही परिषद प्रथम मुंबईत, नंतर वाशीमध्ये आणि आता पुण्यात होत आहे. ही परिषद फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. जगभरात मराठी साहित्य पोहचविण्यासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून मधु मंगेश कर्णिक यांची निवड सर्वानुमते करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधून यंदापासून मराठीचे साहित्य जगभरात पोहचविणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर पुण्यात होणाऱ्या या संमेलनाला परदेशातून ५०० हून अधिक नागरिक आणि साहित्यिक येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
संत साहित्य, अभंगवाणी, लोककला, महिला साहित्य, बालसाहित्य, मराठीतील आधुनिक ट्रेंड, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गाण्यांवर आधारित गाणी, भक्तीगीते आणि आधुनिक गाणी इत्यादी विविध टप्प्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जाईल. फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य सभागृहात तरुण पिढीसोबत विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवर कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी १०० पुस्तकांचे स्टॉल लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि आणखी स्टॉल लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
सामंत म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या विकासासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. याशिवाय, अभिजात भाषेत समाविष्ट असलेली प्राकृत भाषा देखील मराठीचे मूळ आहे, त्यामुळे तिचा वाटा मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. दरम्यान उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तर जगभरातील बृहन मंडळाचे प्रतिनिधीही या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
बैठकीनंतर मंत्री श्री सामंत यांनी विश्व मराठी संमेलन स्थळाची पाहणी केली आणि विविध सूचना दिल्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष योगी निरंजन नाथ, प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. माधवी वैद्य इत्यादी विविध साहित्यिकांसह, फर्ग्युसन कॉलेजच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. रुपाली शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे मराठी भाषा विभाग प्रमुख उपस्थित होते.
Congress Nagpur Protest : सरसंघचालक मोहन भागवतांच्या अटकेची मागणी; काँग्रेचं नागपुरात आंदोलन
पुण्यात होणाऱ्या या संमेलनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देखील या संमेलनाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याशिवाय इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.






