सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेची मागणी; काँग्रेचं नागपुरात आंदोलन
Nagpur News : इंदौर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळालं, अस विधान त्यांनी केल होतं. त्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून नागपुरमध्ये युवक काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन जोरदार आंदोलन केलं. काँग्रेस भवन ते संघ मुख्यालय या मार्गावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.
Walmik Karad: वाल्मीक कराडचे काय होणार? केज कोर्टात उद्या होणार महत्वाची सुनावणी
त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपुरातील युवक काँग्रेसने आंदोलन केले. वादग्रस्त विधानामुळे सरसंघचालकांना अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात आरएसएसची खाकी पँट जाळण्यात आली. मोहन भागवत यांना अटक करा, आरएसएस बॅन असे बॅनर घेऊन आंदोलन करण्यात आलं.
नागपुरातील देवडिया भवन येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांची बैठक झाली. या बैठकीत मोहन भागवत यांच्या विधानाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाकडे जात असताना काँग्रेस कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. संघाच्या मुख्यालयाजवळ जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यामध्येच रोखून ठेवले.
‘अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला’ असं विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं होतं. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वात नागपूरातील देवडिया काँग्रेस भवनमधून निघून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले. मात्र विनापरवानगी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्यापासून पोलिसांनी मध्येच रोखले आहे.
संघाने आधी ध्वजाचा अवमान केला. आता स्वातंत्र्याचा अपमान करत आहे, अशा आशयाचे बॅनर्स घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी संघावर बंदी घाला, अशी मागणीही युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केली. यावेळी गोंधळ होण्याची शक्यता लक्ष्यात घेता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी चिटणीस पार्क चौकावर आधीपासूनच जोरदार बंदोबस्त लावला होता. दरम्यान युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र कार्यकर्ते जास्त संख्येने असल्याने समोर जात होते. अशातच कार्यकर्ते ऐकत नसल्याचे बघून पोलिसांनी ही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, हेही उपस्थित होते. तर यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र पोलिसांनी परिस्थितिवर नियंत्रण मिळवत आता परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.