
पुण्यातील दोन मंत्र्यांनी सर्व ताकद लावली, पण...; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया
अमोल बालवडकर म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांत प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी मी आणि माझी टीम रस्त्यावर उतरून काम केले. काम केल्यामुळेच लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि निवडणुकीत ठाम साथ दिली.”
ते पुढे म्हणाले, “या निवडणुकीत पुण्यातील दोन मंत्र्यांनी सर्व ताकद लावूनही जनतेने कामाला मत दिले आणि आपलाच विजय निश्चित केला. काही नेत्यांनी माझा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न केले, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. जनतेचा विश्वास आणि सत्याची बाजू मजबूत असेल तर कोणतीही ताकद तो विजय रोखू शकत नाही.”
“हा विजय ही केवळ निवडणुकीतील यशाची घोषणा नाही, तर जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याची जबाबदारी आहे. पुढच्या काळात अधिक गतीने विकासकामे पूर्ण करून प्रभाग ९ ला ‘मॉडेल प्रभाग’ बनवण्याचा माझा निर्धार आहे,” असेही अमोल बालवडकर यांनी सांगितले. या विजयानंतर प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी उत्स्फूर्तपणे आनंद व्यक्त केला.
चंद्रकांत पाटलांचं भाकीत ठरलं खोटं
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या प्रचारात उतरून मोठी भविष्यवाणी केली होता. पाटील म्हणाले होते, “प्रभाग 9 मधून भाजपचे लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून विजयी होतील. डायरीत लिहून ठेवा, ही भविष्यवाणी खरी ठरेल.” त्यावर अमोल बालवडकर यांनी पाटील यांची कोणतीही भविष्यवाणी खरी ठरत नसल्याचे सांगितले होते, त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता अमोल बालवडकरांच्या विजयानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी खोटी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.