पुण्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात अंतर्गत नाराजी? भाजप नवीन चेहरे देणार का? कार्यकर्त्यांना विश्वास
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी पक्षांकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विद्यमान आमदारांबाबत नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ सोडला तर पुण्यातील ज्या ज्या मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत, अशा विद्यमान आमदारांच्या विरोधात कमी जास्त फरकाने का होईनात नाराजी असल्याचे चित्र आजपर्यंत पुढे आले आहे. यात सर्वाधिक नाराजी खडकवासला मतदार संघातून आहे. त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती,कोथरूड मतदार संघातून असल्याचे चित्र पुढे आले आहे. यातील कोथरूड मधून पक्षांतर्गत नाराजी कार्यकर्त्यांकडून सामुहिक पणे उघडपणे व्यक्त होत नसली तरी बंडखोरी करत उघडपणे नाराजी अमोल बालवडकर यांनी व्यक्त करत निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसले आहे.
पर्वती मतदार संघातून श्रीनाथ भिमाले यांनी ही माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला थेट आव्हान देत शड्डू ठोकले आहेत. अर्थात येथून मिसाळ यांच्या उमेदवारीला आव्हान देण्याच्या पवित्र्यामागे राज्यातील बड्या नेत्याचा त्यांच्या डोक्यावर हात असल्याचे सांगितले जाते. तर बालवडकर यांच्या मागे मात्र कोण दडलंय हे सध्या तरी सांगणे मुश्कील आहे. पण काल तर खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर याच्या विरोधात या मतदार संघातील नगरसेवकांची बैठक झाल्याचे वृत्त हाथी आले आहे. माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी आणि विद्यमान सघटन मंत्री अजय जाम्ब्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन खडकवासला हातातून जाऊ द्यायचा नसेल तर विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नका असा निरोप दिल्लीत पोचले आहे.
कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला
गेल्या निवडणुकीत आयत्या वेळी बाहेर आलेला व्हिडीओ, जनसंपर्क अजिबात नसलेला आणि शासकीय कोणतीही योजना जनतेपर्यंत घेऊन न गेलेला आमदार म्हणून त्यांची यावेळी गणना करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातून कांबळे आलटून पालटून किती वेळा चालविणार ? कित्येक वेळा ते आपल्या वर्तणुकीतून पक्षाला हानी पोहोचविणारे ठरलेत, गेल्या निवडणुकीत ते निसटत्या मतांनी आले आणि लोकसभेला तर त्यांची तिथून पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झालेले आहे असे सांगत आता हाही मतदार संघ भाजपच्या हातून निसटेल असे सांगितले जातेय. कोथरूड हा मात्र भाजपचा बालेकिल्ला आहे. कोल्हापुरातून आलेले चंद्रकांत पाटील इथून निवडून आले, मंत्री झाले तसे आता इथे पुणेकर झालेले आहे आपल्या स्वभावाने, कामाने त्यांनी सर्वांना आपलेसे केलेले आहे पण कोथरूडमधील स्थानीक नेत्यांनी त्यांच्यामागे भुंगा लावल्याचे सांगितले जाते.
चार आमदारांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी
शिवाजी नगर मतदार संघातून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे विद्यमान आमदार आहेत. खासदारकी सोडून अनिल शिरोळे यांनी नगरसेवक असलेल्या पुत्राला विधानसभेच्या रणांगणात उभे केले होते. उच्च शिक्षित आणि वडिलांच्या प्रमाणेच शांत स्वभावाचा आणि ‘राजकारणी’ नसल्याची त्यांची इथे प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांना विरोध करायला, त्यांच्यावर नाराजी व्यक्त करायला इथे कोणाकडे काही कारण नाही मात्र राजकारणी स्पर्धा करणारे करत आहेत, असे इथले चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील भाजपच्या एकूण ५ आमदारांपैकी जवळपास ४ आमदारांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचे चित्र आजवर दिसून आले असून या ४ पैकी २ ठिकाणी तरी भाजप नवे चेहरे देईल असा विश्वास येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.