
अजित पवार २६ डिसेंबरला स्वत: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, २६ तारखेला युतीची अधिकृत घोषणा करू. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. २६ तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील कोण काय बोलते यावर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू नका, असंही त्यांनी सांगितलं. युतीच्या संदर्भात उद्या मुंबईत आढावा घेतला जाईल. (Thackeray- Brother Alliance)
दरम्यान, ‘पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांना यासाठी प्रस्ताव दिला जाणार असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे अजित पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारणार की नाही, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा २६ तारखेला केली जाणार असल्याचे सुभाष जगताप यांनी ही दिली. (Pune Municipal Election 2025)
शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीच्या चर्चांदरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र जोरदार विरोध केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपण राजीनामा देऊ, असा इशाराही दिला. पण या सगळ्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची एक गुप्त बैठकही झाली. या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष जगताप, सुनील टिंगरे हे उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मुंबईतही उद्या बैठक होणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.