
Pune Maharashtra Politics: आज महानगरपालिका निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान भाजपने आज पुण्यात सांगता सभा घेतली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. तसेच यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य देखील केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सभेत म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट आहे. शिवाजीनगर मतदारसंघात या प्रचाराची सांगता करायची असे मी ठरवले. ही निवडणूक पुण्यात राहणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गेली काही वर्षे आधुनिक पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोकांना असे वाटते की महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक. ही निवडणूक तशी नाही. शहराचे भावी नेतृत्व तयार करणारी निवडणूक आहे. मागच्या काळात 35 हजार कोटीपेक्षा जास्तीचे विकासकामे सुरू केली. प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी, सांडपाण्याचा निचरा असा अनेक गोष्टींचे ठोस आराखडा तयार केलेल्या आहे.”
“आमचे मुरलीधर मोहोळ मगाशी सांगत होते की, मागच्या काळात विकासाच्या नावावर पुण्यात इतके बिंडोक बांधकाम केले. आता भाजपच्या नेतृत्वात पुढील 20 वर्षांचा विचार करतोय. त्यादृष्टीने आम्ही प्लॅनिंग करतोय. वाढीव बांधकामावावरील तिप्पट कर रद्द केला. नागरिकांना दिलासा दिला. तुम्ही जे शिवाजीनगर भागातील 12 नगरसेवक निवडून देणार आहात. ते नगरसेवक आणि आमदार शिरोळे यांच्या पाठीशी राज्याच्या मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे. शिवाजीनगरच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मुख्यमंत्री म्हणून मी देईन. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी 4800 कोटींचा आराखडा तयार केला आहे. पुढील अतिशय वेगवान वाहतूक व्यवस्था असणारे शहर हे पुणे असणार आहे,”असे मुख्यमंत्री म्हणाले.
“पुण्यात आम्ही टनेल्स तयार करतो आहोत. यामुळे पुण्याचा ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येणार आहे. मला आज कोणावर टीका करायची नाही. काही लोक मनात येतील ती आश्वासने दिली जातात. विधानसभेला पुण्यात रेकॉर्डब्रेक जागा निवडून आला. लाडकी बहीण योजना बंद करतील असे विरोधकांना वाटले. जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता माझ्या लाडक्या बहीणींना लखपती दीदी बनवायचे आहे. 50 लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत. केंद्रात, राज्यात आपले सरकार आहे. महानगरपालिकेत देखील आपले सरकार आणायचे आहे.”