
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पुणे जिल्हा परिषदेसाठी नियुक्त निरीक्षक प्रशांत जगताप व ॲड. अभय छाजेड, तसेच वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी उपस्थित होते.
जिल्ह्यात जातीवादी आणि विभाजनवादी राजकारणाला रोखण्यासाठी, तसेच मतविभागणी टाळून व्यापक लोकशाही आघाडी उभारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. या आघाडीपूर्वी दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून, स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. त्या उमेदवारांना दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी मान्यता दिली असल्याचेही सांगण्यात आले.
नामांकन अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागावाटपाची अंतिम आकडेवारी जाहीर केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आघाडी निर्णायक ठरेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला.
लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची सत्ता
राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचितने आघाडी केली होती. लातुरमध्ये या आघाडीला मोठं यश मिळाले आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला जनतेने दिलेला कौल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. भाजपनेही जोरदार प्रचार केला होता. मात्र काँग्रेस- वंचितला मोठं यश मिळालं आहे.