
सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
बारामती/सोमेश्वरनगर : सोमेश्वर पुन्हा एकाची खाजगी मालमत्ता नाही. हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना आहे. दादांच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाविरोधात लढायचे असेल तर मग त्याचे नाव, फोटो का वापरता. स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढा. सगळे मीच केले असे असेल तर मग स्व. दादांनी काय केले. दादांचे नाव घेऊन राजकीय फायदा करून घ्यायचा आणि दादांच्या कुटुंबावर नाराज व्हायचे असे कसे चालले ? असे म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांचा समाचार घेतला.
सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करंजे येथील सोमेश्वर मंदिरात पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भाषण करत पुरुषोत्तम जगताप यांच्यावर हल्ला चढवला. त्या पुढे म्हणाल्या की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दादांनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. कारखान्यासाठी ३४ वर्षे आपल्या जीवाचे रान केले. कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रसंगी आपली आमदारकी पणाला लावली. दादांच्या कर्तृत्वामुळे सोमेश्वर साखर कारखाना फक्त साखर कारखाना राहिला नसून मोठा उद्योग समूह झाला आहे. सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडू नये म्हणून दादांनी जनाई शिरसाई, पुरंदर उपसा यांसारख्या योजना प्रभावी राबवल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटून उसाचे क्षेत्र वाढले. दादांच्या दूरदृष्टीमुळे सोमेश्वर कारखाना उच्चांकी दर देऊ शकला.
सहकारात सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागते. मी म्हणेल तेच होईल असे सहकारात चालत नाही. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जुन्या नव्यांचा मेळ घालून हा पॅनल तयार केला आहे. ही निवडणूक पुन्हा एका व्यक्तीचा किंवा गटाचा पराभव करण्यासाठी नसून शेतकरी हितासाठी आहे. हा आपल्या प्रपंचाचा प्रश्न आहे. त्यामुळे निर्णय घेताना व्यक्तीपेक्षा, आश्वासनांपेक्षा काम पहा. सोमेश्वर कारखाना ही शेतकऱ्यांच्या विश्वासाची संस्था आहे दादांनी घालून दिलेल्या दिशेनेच कारखाना पुढे नेणार.
आज दादा आपल्यात नसले तरी मी आहे. जे दादा करायचे तेच मी करणार. शेतकरी सभासदांच्या प्रत्येक अडचणीत मी खंबीरपणे उभी असेन. आगामी अध्यक्ष निवडतानाही सर्व २१ संचालकांना विचारात घेतले जाईल. सोमेश्वरचा आगामी अध्यक्ष हा नाव गाजवणारा नसून भाव गाजवणारा असेल. येणाऱ्या काळातील उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली जाईल. असे आश्वासन देत आपल्या पॅनलच्या मागे लोकांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
हे सुद्धा वाचा : ‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
यावेळी आमदार सचिन कांबळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, सुरेश घुले, जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल मस्के उपस्थित होते.