ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा 'या' गोष्टी
पुणे/प्रगती करंबेळकर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव जोमात सुरू आहे. मोठ्या ढोलाचा भार, सतत उंचावलेल्या हातांच्या हालचाली, आणि लयीत चालणारे मनगटाचे ठोके या सर्वामुळे वादकांच्या शरीरावर, विशेषतः पाठीच्या कण्यावर, खांद्यांवर आणि मनगटांवर मोठा ताण येतो. सलग दोन महिने चालणाऱ्या या सरावामुळे योग्य काळजी न घेतल्यास वेदना, स्नायू ताण, तसेच दीर्घकालीन इजा होण्याचा धोका वाढतो. त्यांनी ही काळजी कशाप्रकारे घ्यावी, कोणता व्यायाम करावा आणि कोणता आहार घ्यावा याबद्दल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनायक देंडगे यांनी सविस्तर माहीती दिली.
ढोल वाजवताना कलाकारांची देहबांधणी नेहमीच गतिशील असते. मोठा ढोल कमरेवर लटकवून वाजवल्यास त्याचा वजनाचा ताण थेट कण्यावर जातो. वारंवार पुढे झुकणे किंवा वाकणे यामुळे खालच्या पाठीला आणि मानेला ताण बसतो. काही पथकांत ढोल उंच पातळीवर धरला जातो, ज्यामुळे खांदे आणि वरच्या पाठीवरील ताण अधिक वाढतो.
यासाठी डॉ. विनायक देंडगे सांगतात , सरावाच्या आधी आणि नंतर हलके स्ट्रेचिंग करणे अत्यावश्यक आहे. खांदे फिरवणे, मान हळूवार वाकवणे-उचलणे, पाठीसाठी योगासन, आणि मनगटासाठी रोटेशन व्यायाम हे विशेष उपयुक्त आहेत. सरावादरम्यान प्रत्येक ३०-४० मिनिटांनी ५ मिनिटांची विश्रांती घेणे स्नायूंना विश्रांती देते.
ढोलाची पट्टी योग्य उंचीवर बांधणे, वजन समान प्रमाणात दोन्ही खांद्यांवर ठेवणे, आणि पाठीला सरळ ठेवणे हे पोस्चर आरोग्यासाठी चांगले ठरते. पाठीवरील ताण कमी करण्यासाठी वादकांनी सपोर्टिव्ह बेल्ट किंवा बॅक सपोर्टचा वापर करावा, ज्याचा दीर्घ सरावात फायदा होतो.
आहारातील मॅग्नेशियमचा वापर करावा
सलग सरावामुळे स्नायूंमध्ये थकवा आणि गोळे येणे ही समस्या सामान्य आहे. आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थ जसे बदाम, काजू, पालक, भोपळ्याच्या बिया यांचा समावेश केल्याने स्नायूंचे आकुंचन प्रसरण होणे सोपे होते. आणि त्यामुळे दुखापत होण्याची कमी शक्यता असते.
गणेशोत्सव हा भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक एकतेचा उत्सव असला तरी त्यामागे कलाकारांची मेहनत आणि शारीरिक ताण लपलेला असतो. त्यामुळे, योग्य पोस्चर, व्यायाम, विश्रांती आणि संतुलित आहार या चार गोष्टींचे भान ठेवल्यास, कलाकार केवळ आनंदानेच नव्हे तर सुरक्षिततेनेही हा उत्सव साजरा करू शकतात.