
परस्पर संमतीने १८ दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर
बारामती : पती-पत्नीच्या परस्पर संमतीने बारामती न्यायालयाने १८ दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर केला. प्रथमेश आणि स्नेहा (दोघांचीही नावे बदललेली) यांचा १९ मे २०२० रोजी विवाह झाला होता. काही काळ एकत्र नांदल्यानंतर दोघांचेही विचार एकदम भिन्न असल्याचे एकमेकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण विचारांती एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता दोघेही १३ जून २०२२ पासून विभक्त राहत होते.
दोघांचेही कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु ते दोघेही संमतीने घटस्फोट घेण्यावर ठाम राहिले. त्यामुळे त्यांनी अॅड. जब्बार सय्यद बारामती यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बारामती यांच्या न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता हिंदू विवाह कायदा १९५५ चे कलम १३ प्रमाणे अर्ज दाखल केला. त्यामध्ये मे कोर्टाने सदरचा अर्ज मध्यस्थी केंद्राकडे पाठवला; परंतु दोघांनीही संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय निश्चित केल्याचे सांगितले.
सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड माफ करून मिळण्यासाठी अॅड. जब्बार सय्यद यांनी सादर केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप सिंग विरुद्ध हरविण कौर (ए आय आर २०१७ सुप्रीम कोर्ट) या निर्णयातील गुणोत्तराचा आधार घेऊन तसेच स्नेहा हिला तातडीने शिक्षणाकरता परगावी जाण्याबाबतचा केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे कोर्टाने सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड माफ केला. सदर अर्जामध्ये दोघांच्याही वडिलांचे प्रतिज्ञापत्र घेऊन सदर अंतिम अर्जाचा १८ दिवसांमध्ये न्याय निर्णय दिला. म्हणजेच १८ दिवसांमध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बारामती यांनी घटस्फोट मंजूर केला.
कोरियात झाला सर्वात महागडा घटस्फोट
दक्षिण कोरियाचे उद्योगपती आणि एसके ग्रुपचे अध्यक्ष चेय ताए-वॉन यांचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोल उच्च न्यायालयाने पूर्वी ठरलेल्या घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम कमी केली असली तरी, त्यांना त्यांची माजी पत्नी रोह सोह-योंग यांना अंदाजे ९४४ अब्ज वॉन म्हणजे अंदाजे ९४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ८२०० कोटी रुपये म्हणजे तब्बल अंदाजे ८२ अब्ज रुपये इतके द्यावे लागतील. पण हे प्रकरण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही पक्षांची इच्छा असल्यास, ते दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी अपील करू शकतात.