सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : पुरंदर तालुक्यात गणेशोत्सव नेहमी आदर्श आणि उत्साह ठरत असतो. गेल्या बारा दिवसापासून सुरु असलेल्या गणेश उत्सवाची सांगता शांततेत झाली असली तरी बहुतेक मंडळानी रात्री आठनंतर विसर्जन मिरवणुका सुरु केल्यामुळे मिरवणुका रेंगाळल्या. परिणामी रात्री १२ च्या वेळेचे बंधन पळताना अखेर पोलिसांना ठोस भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे काही गणेश मंडळांना ध्वनीविरहित विसर्जन करावे लागले.
सासवडमध्ये दरवर्षी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात होत असतात. गुरुवारी रात्रीपासून विसर्जन मिरवणुका असल्याने अनेक मंडळानी एक दिवस अगोदर बाप्पांना निरोप दिला होता. तर शुक्रवारी दिवसभर मिरवणुका चालतील असा अंदाज होता. मात्र संपूर्ण दिवसभर एक दोन मिरवणुका शांततेत पार पडल्या. या व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या मंडळाची मिरवणूक आली नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसभर बाजारपेठेतील रस्त्यावर शुकशुकाट होता.
शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मानाचा समजल्या जाणाऱ्या अमर मंडळाच्या श्रीं च्या पालखीतील विसर्जनाने सोहळ्याची सुरवात झाली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी सचिन दोलताडे यांसह संजय चव्हाण व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यानच्या काळात त्रिशूल सोसायटी, सेवालाल मंडळ, सोपाननगर मंडळ सह घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले.
त्यानंतर रात्री साडे आठ पर्यंत बाजारपेठेतील मुख्य मिरवणूक मार्गावर शुकशुकाट दिसत होता. सायंकाळी उशिरा विद्युत रोषणाईची गणेश मंडळे मुख्य रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. श्री दत्त, राजर्षी शाहू, आचार्य अत्रे, श्रीमंत नेताजी, श्रीनाथ, संत गोराकुंभार, जयहिंद मंडळ, स्वराज, छत्रपती आदीं मंडळांचा यामध्ये समावेश होता. नेहमीप्रमाणे दत्त मंडळाची मिरवणूक लक्षवेधी झाली. रांगोळीतून प्रबोधन करणारे संदेश, पोतराज व कडक लक्ष्मी, ढोल पथक, राजकमल बँड, फटाके व सुंदर मयुर रथातील श्रीं ची मुर्ती व ओसंडून वाहणारा कार्यकर्त्याचा उत्साह यामुळे गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणें फिटले. गोरा कुंभार, नेताजी, छत्रपती मंडळासह सर्वच मंडळाच्या मिरवणूका प्रेक्षणीय ठरल्या.
पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही गणेश मंडळानी मिरवणुका रस्त्यावर रेंगाळत ठेवल्यामुळे अखेर पोलिसांना ठोस भूमिका घ्यावी लागली. उशिरा येणाऱ्या मंडळांनी अखेर सव्वा बाराच्या सुमारास जय प्रकाश चौकात सामूहिक आरतीने सोहळ्याची सांगता केली. रात्री साडे बारानंतर मिरवणुका बंद केल्यामुळे चार ते पाच मंडळांना कोणत्याही वाद्यांचा वापर न करता विसर्जन करावे लागले.
दरम्यान अकराव्या दिवशी अनेक मंडळांनी विसर्जन केले. ॐ साई, महाराजा, संत सावतामाळी, साईनाथ, माऊली प्रतिष्ठान, तारादत्त पूर्व, अखिल मंडई, शिवदत्त, म्हाडा कॉलनी, सुवर्ण नगरी आदिंचा त्यात समावेश होता. सावतामाळी मंडळाची हत्तीवरील मिरवणुका तसेच ओम साई मंडळाचा रुद्र भैरव रथामधील मिरवणूक लक्षणीय ठरली.
हे सुद्धा वाचा : सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त
पोलिसांच्या आवाहनाला गणेश मंडळांचा कोलदांडा
एका मंडळाचा अपवाद वगळता बाकी सर्व मंडळाच्या मिरवणुकीत गुलालाचा वापर झाला नाही. मात्र पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही डीजे बंदी झुगारत सगळ्यांच मंडळात डीजेचा वापर, बऱ्याच मडळांची बेसुमार फटाकेबाजी पाहायला मिळाली. मिरवणुका वेळेत पार पडाव्या यासाठी पोलिसांनी आवाहन करूनही गणेश मंडळानी पोलिसांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.






