ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेबाबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद हरिभाऊ लाखे निलंबित करण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
Pune News : पुणे : पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ प्रकरणी अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शाळेसंदर्भात गैरवर्तन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत, जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ गोविंद हरिभाऊ लाखे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
नेमके प्रकरण काय?
संबंधित शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने खानवडी येथील शाळेला भेट दिली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांनी वस्तुस्थितीला धरून नसलेली आणि दिशाभूल करणारी माहिती बाहेर प्रसारित केली. ही माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने जिल्हा परिषद संस्थेची जनमानसात मोठी बदनामी झाली. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे.
हे देखील वाचा : ‘आम्ही माफिया नाही तर…’; टँकर व्यावसायिकांनी उगारला संपाचा मार्ग, कारण काय?
निलंबनाचे आदेश
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४’ मधील नियम ३(१) अंतर्गत ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबन काळातील अटी:
१. मुख्यालय बदल: निलंबन कालावधीत गोविंद लाखे यांचे मुख्यालय पंचायत समिती, वेल्हा येथे निश्चित करण्यात आले आहे.
२. परवानगी अनिवार्य: गट विकास अधिकारी किंवा संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
३. व्यवसायावर बंदी: या काळात त्यांना कोणताही खाजगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही.
४. निर्वाहभत्ता: शासन नियमांनुसार त्यांना निलंबन काळात निर्वाहभत्ता दिला जाईल.
मात्र, निलंबनादरम्यान दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे.
हे देखील वाचा : गॅसही संपला अन् केरोसीनही मिळेना! सामान्यांचे हाल, वितरकांमध्ये संभ्रम
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेसंदर्भात चुकीची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे यांनी दिल्यामुळे जिल्हा परिषद संस्थेची जनमानसात बदनामी झाली.त्यामुळे लाखे यांना निलंबित करण्यात येत आहे.”






