
पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
पिंपरी : गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी दुपारनंतर शहरात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चिंचवड परिसरात तब्बल 50 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण तयार होऊनही पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता. मात्र, आज दुपारनंतर वातावरणात अचानक नाट्यमय बदल झाला. सायंकाळी चारच्या सुमारास संपूर्ण आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी झाली आणि शहरावर भरदुपारी काळोख दाटून आला. त्यानंतर काही मिनिटांतच विजांच्या लखलखाटासह धो-धो पावसाला सुरुवात झाली.
या पहिल्याच मोठ्या पावसाने पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी तसेच दापोडीसह बहुतांश उपनगरांना जोरदार तडाखा दिला. अचानक आलेल्या या पावसाने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि वाहनचालकांची काही काळ तारांबळ उडाली. मात्र, संततधार पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत सुखद गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
पुणे शहर व परिसरात केवळ शिडकावा
एकीकडे पिंपरी-चिंचवड आणि मावळ पट्ट्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असताना, पुणे शहरात मात्र केवळ हलक्या सरींवरच समाधान मानावे लागले. पुण्यातील बहुतांश भागांत पाऊस हुलकावणी देताना दिसला.
जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती (सायंकाळी 5:30 पर्यंत) :
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज सर्वाधिक पावसाची नोंद चिंचवडमध्ये (५०.० मिमी) झाली. त्याखालोखाल तळेगावमध्ये ३३.५ मिमी आणि धामधमरे येथे ३१.० मिमी पाऊस पडला. याशिवाय शिरूर २६.५ मिमी, कुरवंडे १८.५ मिमी, पुरंदर ५.० मिमी, हवेली ४.५ मिमी तर दौंड येथे ४.० मिमी पावसाची नोंद झाली. हडपसर, लवासा, माळीण, एनडीए, गिरीवन, पाषाण आणि शिवाजीनगर भागात हलक्या सरी बरसल्या.