पुणे: एचएसआरपी नंबरप्लेट्सची मागणी वाढत असतानाच प्लेट बसविणाऱ्या सेंटरची संख्या मात्र, मर्यादित आहे. सध्या एकूण १२४ अधिकृत सेंटर आहेत. तर प्लेट बसविणाऱ्या वाहनांची संख्या तब्बल २५ लाख एवढी आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात केवळ अडीच लाख वाहनांनी प्लेट बसवली असून अजून २२ ते २३ लाख वाहने बाकी आहेत. वाहनधारकांना यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांची अपॉइंटमेंट मिळत असून, सेंटरमध्ये वाढ करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेले आहेत. तेव्हापासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होत आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेदृष्टीने तयार केलेल्या आहेत. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणार्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच २०१९ पुर्वीच्या वाहनांनाही ही नंबर प्लेट बंधनकारक केले आहे.
सुरवातीला ३१ मार्च पर्यंत हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावून घेण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, जुन्या वाहनांची संख्या मोठी असल्याने ही मुदत आता ३० जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान एकट्या पुण्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांची संख्या २५ लाख एवढी आहे. अद्याप पर्यंत यातील केवळ दोन ते अडीच लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. नंबर प्लेटबाबत ऑनलाईन प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकृत एजन्सीकडून नेमलेल्या सेंटरमधून प्लेट बसून घ्यावी लागते. त्यासाठी शहरात १२४ सेंटर आहेत. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने ऑनलाइन अर्ज केल्यानंतरही नागरिकांना प्रत्यक्ष प्लेट वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे एजन्सीने सेंटरमध्ये वाढ करावे अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
एचएसआरपी साठी अर्ज केलेली वाहने – २ लाख ८० हजार
प्रत्यक्ष प्लेट बसविलेली वाहने – ५६ हजार
एकूण जुन्या वाहनांची संख्या – २६ लाख ३६ हजार
अपॉइंटमेंट दोन महिन्यानंतर
सद्यस्थितीत एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील दोन महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतरही प्रत्यक्ष नंबर प्लेट येण्यासाठी वाहनधारकांना वाट पहावी लागणार आहे.
पुणेकरांचा थंड प्रतिसाद
शहरात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून फारसा उत्साह दिसत नाही. वाहनांची चोरी व बनावट नंबर प्लेट सुरू करण्यासाठी ही प्रणाली केंद्र सरकारने लागू केली असली तरी पुण्यात अजूनही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. पुण्यात एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद असून अद्याप अडीच लाख वाहनधारक या नंबर प्लेटच्या प्रतीक्षेतच असल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही नंबर प्लेट बसविण्यासाठीची मुदत ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे.