Pune Congress: Big setback for Congress in Pune! 100 office bearers including the General Secretary of Maharashtra Pradesh Youth Congress will resign..
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पक्षांतराचे लोण चांगलेच पसरू लागले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय प्राप्त झाला तर महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडून येऊ लागल्याचे दिसत आहे. अशातच पुण्यात कॉँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला देखील गळती लागल्याची चर्चा शहरात होऊ लागली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य १०० पदाधिकारी देखील येत्या २ ते ३ दिवसात राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा : नगर रोडवरील वाहतूकीचा वेग वाढला, रस्त्यातील अडथळे दूर; नेमकं काय बदल केलेत?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. विरोधीपक्षातील नेत्यांचा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अथवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत असल्याचे राज्य पाहत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार अशी बातमी समोर आली होती.
हेही वाचा : पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न, नेमकं काय घडलं?
आता पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली असून, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये सुरवसे पाटलांसह युवक काँग्रेसचे १०० पदाधिकारी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता पुण्यात कोंग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील कोंग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून अंतर्गत कुजबूज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सुरवसे पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीमुळे कॉँग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.