सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरातून बाहेर पडण्यासाठी आणि शहरात दाखल होण्यासाठी प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूकीचा वेग वाढला असून, वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मार्गावरील कोंडी फुटून हा वेग वाढला आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी या भागात प्रायोगिक तत्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, यु-टर्न, राईट टर्र्नमध्ये बदल केले. त्यामुळे वाहतूकीचा वेग गतवर्षीच्या (जानेवारी ते फेब्रुवारी) तुलनेत यंदा १६ ते १९ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
नगर रस्त्यावरील गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. गेल्या काही वर्षात हे प्रमाण मोठे वाढले होते. त्यात अपघाताची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपुर्वी नगर रस्त्याची पाहणी केली. येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या. त्यानूसार वाहतूक विभागाने नगर रस्त्यावरील समस्यांचा अभ्यास केला. महापालिका व पोलीसांनी संयुक्तपणे काम करीत उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक सुधारली आहे. त्यासोबतच वाहतूकीचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी वाहतूक कोंडीतून सुटकेचा श्वास सोडला आहे. अतिरीक्त आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजना राबविण्यात आल्या.
काय बदल केले?
येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगरकडे जाणार्या राईट टर्नमुळे मुख्य नगर रोडवर कोंडी होत होती. त्यामुळे हा राईट टर्न बंद करून पुढे यु टर्न दिल्याने मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली. तर, वडगाव शेरी चौकातून नगरकडे जाताना अग्निबाज गेटसमोरून यु टर्न देण्यात आला. तर पुण्याकडे येताना मेट्रो पिलर ४२२, ४२३ येथे यु टर्न दिला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी होवून वेग वाढण्यास मदत झाली. विमाननगर चौक (फिनीक्स मॉल) येते राईट टर्नमुळे मुख्य रस्त्यावर कोंडी होत होती. पोलिसांनी हा राईट टर्न बंद करून चौक सिग्नल विरहीत केला. तर, खराडी दर्गा चौकातील राईट टर्न बंद करून आपले घर बसस्टॉप पासून यू टर्न केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सिग्नल विरहीत झाली. येरवडा ते खराडी या भागात केलेल्या या उपाययोजनानंतर एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीव्दारे वाहतूकीचा फ्लो पाहूण करण्यात आलेल्या विश्लेषणाव्दारे संबंधीत भागातील वेग वाढल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या (जाने – फेब्रुवारी) तुलनेत १६ ते १९ टक्क्यांनी हा वेग वाढला आहे.
वाघोली भागात विशेष कारवाई
नगर रस्त्यावरील वाघोली भागात सर्वाधिक वाहतूक कोंडींचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या परिसरात विशेष कारवाई केली. यात वाघेश्वर चौक ते केसनंद फाटा तसेच बकोरी फाट्यापर्यंत रोडच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमणे, पोस्टर, टपर्या काढून टाकण्यात आल्या. रस्त्यावरील खड्डे बूजवून, रस्त्याचे डांबरीकरण केले. वाघोली वाहतूक विभागाच्या हद्दीत ट्रॅव्हल्सवर कारवाई करून त्यांना अटकाव करण्यात आला. परिसरातील बेशिस्त वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात लगाम लावण्यात पोलिसांना यश आले आहे. परिणामी वाहतूक देखील सुरळीत झाली आहे.
३४ हजार केसेस, अडीच कोटींचा दंड
नगर रस्त्यांवरील बेशिस्त वाहनधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असून, चालू वर्षात जानेवारी ते १० मार्चपर्यंत म्हणजे, सव्वा दोन महिन्यात तब्बल ३४ हजार ३११ केसेस करून २ कोटी ४८ लाखांचा दंड आकारला आहे. यामध्ये राँग साईड, ट्रीपल सिट, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, नो पार्किंग, सिग्नल तोडणे आदींचा समावेश आहे.
नगर रस्त्यावर मागील काही महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे कोंडी फुटून वाहतूकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. सुरळीत वाहतूकीसाठी अनेक ठिकाणी बदल केले आहेत. सुधारणांमुळे वेग वाढला असून, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई देखील केली जात आहे.
– अमोल झेंडे, उपायुक्त, वाहतूक शाखा.