संग्रहित फोटो
पुणे : धुलीवंदनाच्या दिवशी मिनाताई ठाकरे वसाहतीत दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना जीवे ठार मारण्याचे प्रयत्न झाले असून, याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. शुल्लक कारणावरून या घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर हल्यानंतर टोळके तेथून पसार झाले. याप्रकरणी केशव अनिल शिवशरण (वय २०, रा. सुखसागरनगर) याच्या तक्रारीवरून रोहित सिंग, दर्शन सुतार, संकेत यांच्यासह सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी शहरात मद्यपींकडून वाहने चालविल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले. शहरात झालेल्या दिवसभराच्या कारवाईत तब्बल ४०० जणांना पकडले. दुसरीकडे शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील ठेवला होता. यादरम्यान, केशव शिवशरण हा स्वारगेट भागातील मिनाताई ठाकरे वसाहतीत असताना त्याने आरोपींना गाडी बाजूला घे म्हणल्यावरून त्याच्यावर हल्ला केला. टोळक्याने लोखंडी हत्यार तसेच लाकडी बांबूने त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टोळक्याने दहशत देखील पसरविली. तक्रारदारांसोबतच त्यांच्या मित्रांना देखील मारहाण करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राहूल कोलंबीकर हे करत आहेत.
तर, रोहित सिंगच्या तक्रारीवरून अमय शेखापुरे, सचिन खुडे, सागर कदम, संतोश कांबळेसह आठ ते नऊ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारीनुसार, सचिन मानेसोबत का फिरत असतो म्हणून टोळक्याने तक्रारदार तरुणाला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचा भाचा दर्शन सुतार व त्याच्या मित्राला देखील मारहाण केली.
धुलीवंदनाच्या कार्यक्रमात तरुणाला मारहाण
धुलीवंदनाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टेजवर असलेल्या तरुणाला खाली उतर म्हणून मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत अंकित माणकेश्वर सिंग (वय २६) याने तक्रार दिली आहे. त्यानूसार, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणाला हाताने मारहाण करून स्टेजवरून खाली ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. शहरात ठिकठिकाणी धुलीवंदनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याठिकाणी सेलिब्रेटी यांना आमंत्रित केले होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूकीची बेशिस्त पाहिला मिळाली. तर अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे वादविवादाचे प्रकार घडले.