
malfunction of EVM machines in the Pune voting process is being discussed pmc elections 2026
शहरातील विविध प्रभागांमध्ये सकाळपासूनच तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरू होते. मतदान सुरू होण्याच्या नियोजित वेळेनंतरही अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीन कार्यान्वित न झाल्याने मतदारांना ताटकळत थांबावे लागले. काही केंद्रांवर मशीन सुरू झाली तरी काही वेळातच बटन काम न करणे, मत नोंदवले जात नसल्याच्या तक्रारी, तसेच स्क्रीनवर चुकीचे संकेत दिसत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
या सगळ्या गोंधळात शहरातील शिवाजी मराठा हायस्कूल येथील प्रकार विशेष लक्षवेधी ठरला. येथे फक्त एकाच पक्षाला मतदान होत असल्याचा आरोप करत मतदारांनी संताप व्यक्त केला. काही काळासाठी मतदान प्रक्रिया थांबली, तर प्रशासन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या घटनेमुळे मतदानाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
हे देखील वाचा : एक स्टेटस पडलं महागात! प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरुच; 66 उमेदवारांना नोटीस
राजकीय विश्लेषकांच्या मते, ईव्हीएमवरील अविश्वास हा नवीन विषय नाही. मात्र प्रत्येक निवडणुकीत अशा तांत्रिक अडचणी वारंवार समोर येत असल्याने मतदारांचा विश्वास अधिकच ढासळत आहे. “मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक वेळ काढतात, पण केंद्रावर पोहोचल्यानंतर मशीन बंद असल्याचे कळल्यावर त्यांची निराशा होते,” असे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे. याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचेही दिसून येत आहे.
प्रशासनाकडून मात्र सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, “तांत्रिक अडचणी तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या, पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान सुरळीत करण्यात आले,” असा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी तासन्तास मतदान ठप्प राहिल्याने मतदारांचा संयम सुटल्याचे चित्र दिसून आले. काही नागरिकांनी तर “ईव्हीएमपेक्षा कागदी मतपत्रिकाच बऱ्या” अशी उघड नाराजी व्यक्त केली.
हे देखील वाचा : मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, या निवडणुकीत प्रचारापेक्षा मतदान प्रक्रियेतील अडथळेच अधिक चर्चेत राहिले. विकास, प्रश्न, आश्वासने यांपेक्षा ईव्हीएम बिघाड, बटन खराब, लिंकिंग एरर अशा शब्दांनीच निवडणुकीचा सूर ठरवला. लोकशाही प्रक्रियेवर विश्वास निर्माण करणे ही यंत्रणेची जबाबदारी असते. मात्र पुणे महापालिका निवडणुकीत हा विश्वास टिकवण्यात प्रशासन कमी पडल्याची टीका होत आहे.