जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण यात्रेला मोठा प्रतिसाद; वाहनांच्या ताफ्यामुळे चाकण परिसर भगवामय
चाकण : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गुरुवारी (दि. २८) सकाळपासूनच पुणे-नाशिक महामार्ग, शिक्रापूर- चाकण-तळेगाव मार्ग तसेच जुन्नरमार्गे येणाऱ्या रस्त्यांवर हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते, तरुण, आणि ज्येष्ठ नागरिक आपापल्या वाहनातून झेंडे, बॅनर, फलक घेऊन आरक्षणाच्या घोषणाबाजी करत चाकण मार्गे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि. २७) अंतरवली सराटी येथून ही ऐतिहासिक रॅली किल्ले शिवनेरीच्या दर्शनानंतर सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या मातीचा माथ्यावर तिलक लावून त्यांनी “आरक्षणासाठी आरपारची लढाई” या निर्धाराने मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी प्रस्थान केले आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला असून, प्रत्येक गावातून वाहनांचे ताफे निघून या आंदोलनात सामील होत आहेत.
पोलिसांचा विशेष बंदोबस्त
दरम्यान, हजारो वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चाकण पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. महामार्गावरील बसेस, अवजड वाहने यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. तसेच चाकण व आजूबाजूच्या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विविध संघटनांकडून स्वागत
रॅलीतील कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने चहा, नाष्टा, पाणी व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध संघटनांनीही यात्रेचे स्वागत करत सहकार्य केले आहे. संपूर्ण मार्ग भगव्या झेंड्यांनी, फलकांनी सजला असून वातावरणात “जय जिजाऊ, जय शिवराय” आणि “मराठा आरक्षण हक्क आमचा” अशा घोषणांचा निनाद घुमत होता.
जरांगे पाटलांच्या उपोषणापूर्वी दुर्दैवी घटना
राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव हे थेट आता मुंबईकडे निघाले आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईला जात असताना एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. सतिष देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत व्यक्ती वरडगाव केज येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.