
Maval Taluka NCP Vice President Prashant Bhagwat and his wife Megha Bhagwat join BJP
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये ऑपरेशन लोटसला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद इंदोरी–वराळे गटातून मेघा भागवत या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होत्या. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. यासंदर्भातील पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. इंदोरी–वराळे गटात काँग्रेसमधून आलेल्या ‘आयात’ उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने भागवत दाम्पत्याने राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. आपल्या पत्नीला डावलले जाणार, ही शंका गृहीत धरूनच हा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हे देखील वाचा : पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?
प्रवेशाच्या काही वेळ आधी आमदार सुनील शेळके यांना याबाबत विचारले असता, “प्रशांत भागवत आजही आमच्यासोबत आहेत,” असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आमदार शेळके यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार सुनील शेळके नेमके काय म्हणाले?
प्रशांत भागवत यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही. तुमच्याकडे आला असेल, पण माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. प्रशांत भागवत कालही आमच्यासोबत होते आणि आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होते. संध्याकाळी त्यांना काही निर्णयांबाबत चर्चा करायची होती. मात्र त्यांनी ब्राह्मणवाडीतील त्यांच्या घराचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याची परवानगी मागितली. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळे आम्हाला राजीनाम्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.” असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
उमेदवारीबाबत बोलताना आमदार शेळके पुढे म्हणाले की, “त्याची उमेदवारी कोणी कापली? कोणाला दिली किंवा कोणाला नाकारली, याबाबत आम्ही अजून कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. कोअर कमिटीमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. उद्या युतीअंतर्गत काही जागा सोडाव्या लागल्या तर आम्हालाही ऐकावे लागेल, भाजपलाही ऐकावे लागेल आणि इच्छुक उमेदवारांनाही ऐकावे लागेल. योग्य वेळी सगळे स्पष्ट केले जाईल.”