
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील नागरी वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची कामे करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच तळेगाव दाभाडे ग्रामीण भागाचा नगरपरिषद हद्दीत समावेश करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तळेगाव दाभाडे ग्रामीण कृती समितीच्या वतीने हद्दवाढीसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नगरपरिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आंदोलनस्थळी भेट देऊन आमदार शेळके यांनी आंदोलकांशी संवाद साधला. विविध नागरी वसाहतींमधील समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
कृती समितीच्या वतीने नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन देण्यात आले. गणपती माळ, शिंदे वस्ती, काकडे वस्ती तसेच ठाकरवाडी (१ ते ३) या नागरी वस्त्यांना नगरपरिषदेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा व सेवा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच तळेगाव दाभाडे ग्रामीण भागाचा नगरपरिषद हद्दीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
कचरा संकलन सशुल्क पद्धतीने सुरू करणार
नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावावर शासनस्तरावर तातडीने निर्णय होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच कचरा संकलन सशुल्क पद्धतीने सुरू करण्यात येईल. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन पाणीपट्टी आकारून संबंधित भागात पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आकार फाउंड्रीपर्यंत नगरपरिषद हद्दीतील विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठीही कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मोर्चात नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, भाजपचे गटनेते इंद्रकुमार ओसवाल, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी तसेच कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचीही मोठी उपस्थिती होती.
हद्दवाढीचा प्रश्न शासनदरबारी पाठपुरावा करू
मोर्चानंतर आमदार शेळके यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. हद्दवाढीचा प्रश्न शासनदरबारी पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निधीच्या घोषणेचे मोर्चातील सहभागी नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. गणेश शिंदे यांनी आभार मानले.