
मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप
भाजपविरोधी मतदान करणाऱ्या अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी केंद्रावर केंद्र फिरावे लागले असून, यामुळे उशिरा मतदान होत आहे आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत नाही. मतदारांना मतदान कुठे करायचे हेच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. याला पूर्णतः सत्ताधारी भाजप जबाबदार असून, प्रशासनावर दबाव टाकून लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणले जात आहेत. काही मतदान केंद्रांवर भाजपचे कार्यकर्ते १०० मीटरच्या आत उभे राहून मतदारांना स्लिप वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे थेट निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, भाजपच्या हातातून ही निवडणूक जाणार या भीतीने भाजपच्या काही नेत्यांनी मतदानाच्या आदल्या रात्री प्रत्येकी पाच हजार रुपये वाटल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा हा प्रकार असून, याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
हे सुद्धा वाचा : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर
पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ
पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून, बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे.