संग्रहित फोटो
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील यशवंतराव पाटील विद्यामंदिराच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली. “महायुती विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेसला चांगले यश महाराष्ट्रात सर्व महापालिकेत मिळेल. महाराष्ट्रात महायुती स्वतंत्र लढत आहे. मात्र कोल्हापुरकरांच्या भीतीमुळं कोल्हापुरात महायुती एकत्र आले आहेत. भाजपा- महायुतीकडे प्रंचड पैशाची ताकद आहे, दडपशाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यापर्यंत मजल गेली आहे. शेवटच्या २४ तासांत आमच्या कार्यकर्त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न झाला, तो आम्ही हाणून पाडला. मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा नेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या दडपशाहीला कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर आणि काँग्रेसवर विश्वास दाखवतील, ” अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.
पुढं ते म्हणाले की, “भाजपा महायुतीने चांगले काम केले असेल तर मग दडपशाहीचं त्यांनी राजकारण करू नये. मतदान केंद्रावर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आहेत. मात्र प्रशासन त्याच्यावर तातडीनं उपाययोजना करत आहे. कोल्हापुरातल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर जनतेचा विश्वास नाही. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना येवून कोल्हापूरकरांना विश्वास द्यावा लागला. एवढी वेळ त्यांच्यावर आली आहे, या लढाईत कोल्हापूरकर माझ्याबरोबर असतील. मतदार यादीतील घोळ अजूनही प्रचंड आहे. तो आम्ही निदर्शनास आणून दिला आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार केंद्र बनवली आहेत. पूर्ण नियोजन प्रशासनानं आपल्याला त्रास होवू नये असे केले आहे. एवढी वर्ष निवडणूक आयोग मतदान घेते. त्यासाठी महाराष्ट्र शासन पैसे देते. त्यामुळे अपडेट होणं गरजेचं आहे. मतदार यादीत आमदारांची नावं नसणं हे लोकशाहीचं दुर्दैवं आहे. मतदार यादी दोषयुक्त आहे की दोषमुक्त नाही, हे यावरून स्पष्ट होते. कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले तरी कोल्हापूरकर सुज्ञ आहेत ते माझ्याबरोबर आणि काँग्रेसबरोबर राहतील,” असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनीही काँग्रेसवर निशाणा साधत कोल्हापूरची जनशक्ती महायुतीसोबत राहील, असं म्हटले आहे. “राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील. महापालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल. आज माझा वाढदिवस साजरा करणार नाही. उद्या महायुतीच्या विजयच माझा वाढदिवस असेल तर १५ जानेवारी काँग्रेस कायमचं घरी अशी टॅगलाईन लागलेली उद्या तुम्हाला दिसेल.
सतेज पाटलांच्या टिकेला महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांच्या मानसिकतेवर थोडा ताण आला आहे. सतरंज्या उचलण्याचे काम कायमपणाने कार्यकर्ते करतात. आम्हीही केले आहे. कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवार मिळणेही मुश्किल झाले होते. तीन ठिकाणी एकाच घरात उमेदवारी तर मुलाला आणि मुलीला उमेदवारी देण्याचं काम काँग्रेसनं केले आहे. सतेज पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यात प्रचंड पैशाचं वाटप झाले. तुमचं चांगलं काम असेल तर पैसे वाटण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे. त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच राहील. तसेच कोल्हापूरची जनशक्ती महायुतीसोबत राहील,” असेही खासदार धनंजय महाडिक म्हणाले.
हे सुद्धा वाचा : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
कोल्हापूर महापालिकेसाठी आज सकाळी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह माजी आमदार मालोजीराजे, छत्रपती मधुरिमा यांनी कोल्हापुरातील नवीन राजवाडा मराठी शाळा या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी, “चांगले आणि सक्षम उमेदवार या निवडणुकीत निवडून यावेत,” अशी अपेक्षा खासदार शाहू छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरीकडे, भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी रुईकर कॉलनी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. तर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावड्यातील यशवंतराव पाटील विद्यामंदिर मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.






