Pune Agricultural News: मॉन्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पुण्यात केवळ २०% खरीप पेरण्या पूर्ण
पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वाफसा येत असल्याने शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पेरणीच्या अगोदर मशागतीही काही ठिकाणी सुरू असल्याने कुळवणीसाठी लगबग सुरू आहे.
Pune Agricultural News: पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, पिकांचे नुकसान झालेच, परंतु त्याचा फटकाही पूर्व मशागतीवर झाला असून, पुणे जिल्ह्यात खरीपाच्या केवळ 20 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी शिरूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 40 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कळविले आहे.
दरम्यान मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने आता उघडीप दिल्याने पेरण्यांना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यात खरीप पिकांचे क्षेत्र हे २ लाख २ हजार २६३ हेक्टर इतके असून, यापैकी ४० हजार १८२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. एकट्या शिरूर तालुक्यात ११ हजार २२ हेक्टरवर खरीप पेरण्या उरकल्या आहेत.
जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका असून, पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी तसेच खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये प्रामुख्याने भात लागवड केली जाते. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळेत बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने भात शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असले, तरी या सलग पावसामुळे काही भागांत रोपवाटिकांची कामे खोळंबली आहेत. पुणे जिल्ह्यात सुमारे ५ हजार ६४ हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिका उभारण्यात आल्या असून, काही ठिकाणी रोपे तयार होण्यास विलंब होत आहे.
पुणे विभागात ४ लाख ५१ हजार ५०७ हेक्टर म्हणजेच ३६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पाऊस जोरदार झाल्याने आणि मॉन्सून लवकर राज्यात आल्याने पूर्व मशागतीचा फटका खरीप हंगामाच्या पिकांच्या वाढीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.पुणे विभागात आत्तापर्यंत १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टरपैकी, सुमारे साडेचार लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, चवळी, हुलगा, घेवडा, वाटाणा आदींसह अन्य कडधान्यांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वाफसा येत असल्याने शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पेरणीच्या अगोदर मशागतीही काही ठिकाणी सुरू असल्याने कुळवणीसाठी लगबग सुरू आहे. या आठवड्यात पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.विभागामध्ये अहिल्यानगरमध्ये खरीप हंगामातील पेरणीस सुरुवात झाली आहे. बाजरी, मका पीक उगवण अवस्थेत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन पिकांची पेरणी, तर कापूस पिकांची लागवड होऊन उगवण अवस्थेत आहे.
अकोले तालुक्यामध्ये रोपवाटिका क्षेत्रावर १ हजार ८३१ हेक्टर क्षेत्रावर भात रोपे तयार करण्यात आलेली आहेत. पुणे जिल्ह्यात बाजरी, मका पीक उगवण अवस्थेत आहे. मूग पीक उगवण झाली असून, दोन पानांच्या अवस्थेत आहे. सोलापुरात खरीप हंगामात पेरणी झालेले बाजरी पीक उगवण अवस्थेत असून, पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.
एकूण पुणे विभागात झालेली पेरणी
• सरासरी क्षेत्र – १२,५६,४३९
• पेरणी झालेले क्षेत्र – ४,५१,५०७
• टक्के- ३६
• अहिल्यानगर- २,६८,८११
• पुणे – ३९,१६३
• सोलापूर – १,४३,५३३
Web Title: Only 20 of kharif sowing completed in pune due to pre monsoon rains