पुणे: महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमधून महिलांना महिलादिनी मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) जागतिक महिला दिनानिमित्त (दि. ८ मार्च रोजी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील १३ मार्गांवर ही मोफत सेवा दिली जाणार आहे.
पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार पीएमपीच्या स्वारगेट, न. ता. वाडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, अप्पर, पुणे स्टेशन, निगडी, पिंपरी आणि भोसरी या आगारातून या तेजस्विनी बस सोडण्यात येणार आहेत. त्यांच्या दिवसभरात जवळपास ४२ फेऱ्या होणारआहेत. महिला प्रवाशांना तात्काळ आणि मोफत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकाही मार्गावर तेजस्विनी बस बंद न ठेवता सेवा सुरळीपणे सुरू रहावी, अशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
या तेजस्विनी बसमध्ये महिला वाहक सेवकांची नेमणूक करण्यात यावी. आगार प्रमुखांनी मार्गावरील बसस्थानकावर उपस्थित राहून महिलांना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. या बसमधून केवळ महिला प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा, असा सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
स्वारगेट ते हडपसर – ५
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर – २
कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन – २
एनडीए गेट क्रमाअंक १० ते मनपा – २
कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड – ७
कात्रज ते कोथरूड डेपो – ६
हडपसर ते वारजे माळवाडी – २
भेकराईनगर ते मनपा – २
मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव – २
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द – २
निगडी ते मेगा पाॅलीस हिंजवडी – ४
भोसरी ते निगडी – ४
चिखली ते डांगे चौक – २
8 मार्चलाच का साजरा केला जातो महिला दिन
दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरीला ओळखण्यासाठी समर्पित आहे. याशिवाय, हा दिवस महिलांचे हक्क आणि समानतेबद्दल जागरूकता वाढवण्याची एक विशेष संधी आहे. या खास दिवशी महिलांचा सन्मान करण्याची प्रथा आहे. आज व्यावसायिक, वैयक्त्तिक अथवा कोणत्याही क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहेत. समाजाच्या नियमांना मोडून आजच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे, घर सांभाळत आहेत आणि वेळ पडलीच तर स्वतःची सुरक्षाही स्वतः करत आहेत.
Women’s Day 2025: 8 मार्चलाच का साजरा केला जातो महिला दिन; जाणून घ्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
आपण इतिहास खोलून पाहिला तर पूर्वीपासूनच महिलांनी विशेष असा दर्जा देण्यात आलेला नाही मात्र या बदलत्या काळात हा बदल काही अंशी झाल्याचे दिसून येते. आजच्या युगात महिला मुक्तपणे समाजात वावरू शकतात, त्यांना हवं ते करू शकतात आणि आपले मत मोकळेपणाने मांडूही शकतात. महिला दिनाच्या या खास दिनानिमित्त आज आपण या लेखात महिला दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली? आणि या दिवसाचे महत्त्व काय ते सविस्तर जाणून घेणार आहोत.