(फोटो सौजन्य: istock)
दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरीला ओळखण्यासाठी समर्पित आहे. याशिवाय, हा दिवस महिलांचे हक्क आणि समानतेबद्दल जागरूकता वाढवण्याची एक विशेष संधी आहे. या खास दिवशी महिलांचा सन्मान करण्याची प्रथा आहे. आज व्यावसायिक, वैयक्त्तिक अथवा कोणत्याही क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहेत. समाजाच्या नियमांना मोडून आजच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे, घर सांभाळत आहेत आणि वेळ पडलीच तर स्वतःची सुरक्षाही स्वतः करत आहेत.
आपण इतिहास खोलून पाहिला तर पूर्वीपासूनच महिलांनी विशेष असा दर्जा देण्यात आलेला नाही मात्र या बदलत्या काळात हा बदल काही अंशी झाल्याचे दिसून येते. आजच्या युगात महिला मुक्तपणे समाजात वावरू शकतात, त्यांना हवं ते करू शकतात आणि आपले मत मोकळेपणाने मांडूही शकतात. महिला दिनाच्या या खास दिनानिमित्त आज आपण या लेखात महिला दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली? आणि या दिवसाचे महत्त्व काय ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
महिला दिनाचा इतिहास
माहितीनुसार, या दिवसाची सुरुवात 1975 मध्ये झाली जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ साजरे करताना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन केले. दोन वर्षांनंतर, म्हणजे 1977 साली, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 8 मार्च हा दिवस ‘महिला हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. मात्र, महिला दिनाचा इतिहास यापेक्षा खूप पूर्वीचा आहे. 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने प्रथमच तो साजरा केला. यानंतर महिला दिनाबाबत दीर्घकाळ संघर्ष आणि आंदोलने झाली, ज्यामध्ये महिलांनी त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आवाज उठवला.
महिला दिनाचे महत्त्व
महिला दिनाचा उद्देश महिलांचा संघर्ष, त्यांचे हक्क आणि समाजातील त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. हा दिवस समाजाला याची आठवण करून देण्याची संधी आहे की महिलांना अजूनही पुरुषांच्या निर्णयांवर अवलंबून राहावे लागते, मग ते घर असो किंवा कामाच्या ठिकाणी. या दिवसाच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान हक्क आणि संधी मिळण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळते. तसेच समाजातील त्याची भागीदारी आणि निर्णयक्षमतेला आणखीन मजबूत करण्यास मदत करते.
महिला दिनासाठी 8 मार्च हा दिवस का निवडण्यात आला?
आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी 8 मार्चच्या तारखेची निवड एका ऐतिहासिक घटनेशी जोडलेली आहे. 1917 मध्ये, रशियामधील महिलांनी ऐतिहासिक संप केला, जो राजकीय बदलाचे कारण बनला. त्या वेळी, ज्युलियन कॅलेंडर रशियामध्ये वापरले जात होते, तर उर्वरित जग ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत होते. ज्युलियन कॅलेंडरनुसार, 1917 चा शेवटचा रविवार 23 फेब्रुवारीला होता, तर ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये तीच तारीख 8 मार्च होती. रशियन क्रांतीचा पाया घालणाऱ्या ‘ब्रेड अँड पीस’च्या मागणीसाठी महिलांनी अनेक निदर्शने केली. ज्यानंतर शासन समाप्त झाले आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निवडण्यात आला.
कसा साजरा केला जातो हा दिवस?
या खास दिनानिमित्त दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी रॅली, चर्चासत्रे यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांचे आरोग्य, शिक्षण, करिअर या विषयांवर चर्चा केली जाते आणि महिलांना आपले मत मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.