भिगवणमधील निकृष्ट रस्ता कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल; अधिकाऱ्यांकडून पाहणी करून कंत्राटदाराला सूचना
भिगवण : भिगवण शहरातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबत आणि साडेपाच कोटी रुपये खर्च करून रस्त्याला पडलेल्या तड्यांबाबत ‘नवराष्ट्र’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शशिकांत तुपे यांनी तात्काळ रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित कंत्राटदाराला उर्वरित व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.
पोलीस स्टेशन ते थोरात नगर या दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यातच रस्त्याला तडे गेल्याचे समोर आले होते. तसेच रस्त्याच्या साईड पट्ट्या अपूर्ण राहिल्याने छोटे-मोठे अपघात घडत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
या समस्येची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास योग्य त्या तांत्रिक दुरुस्तीच्या आणि सुरक्षिततेच्या सूचना दिल्या. तसेच, येत्या आठ दिवसांत पूर्ण झालेल्या रस्त्याच्या उर्वरित सर्व साईड पट्ट्या भरून दिल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे स्थानिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शशिकांत तुपे, उदयसिंह नांदखिले, ग्रामपंचायत सरपंच गुरप्पा पवार, युवा नेते अजिंक्य माडगे, तुषार क्षीरसागर, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे जावेद शेख, अमित वाघ, औदुंबर हुलगे, अक्षय शिंदे, दिलीप करे, गणेश कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वीस वर्षानंतर अंतर्गत मुख्य रस्त्यासाठी प्रथमच एवढा मोठा निधी
राज्याचे कृषिमंत्री व इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून वार्ड क्रमांक एक ते चार पर्यंतच्या मुख्य रस्त्यासाठी जवळपास पावणे सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याचे काम देखील सुरू आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य बारकाईने नजर ठेवून आहेत. येथून पुढच्या काळात देखील नागरिकांनी सतर्क राहून रस्त्याच्या गुणवत्ता व दर्जाबाबत लक्ष ठेवावे.






