फोटो सौजन्य सोशल मीडिया
इराणच्या प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटाजवळ १४ हून अधिक तेलवाहू जहाजे उभी असल्याचे उपग्रह छायाचित्रे आणि जहाजांच्या हालचालींमधून समोर आले आहे. या जहाजांवर कर्मचारी तैनात करण्यात आले असून काही जहाजांवर इराणचे झेंडेही फडकवण्यात आले आहेत.
या जहाजांना एकत्रितपणे ओमानच्या आखाताच्या दिशेने पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, हा ताफा प्रत्यक्ष नाकेबंदी ओलांडण्यासाठी रवाना झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. खार्ग बेटावरून इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचा मोठा हिस्सा होतो. त्यामुळे या भागातील जहाजांची हालचाल अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी ही युद्धासमान कारवाई असल्याचे म्हटले आहे. नाकेबंदी मोडण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी दिला. इराणशी संबंधित माध्यमांमध्ये तेलवाहू जहाजांचा ताफा अमेरिकेच्या नाकेबंदीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अमेरिकेने या जहाजांना अडवण्याचा किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास आखाती देशांमधील तेल प्रकल्पांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी धमकीही देण्यात आली आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावर तणाव वाढल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. अमेरिकेने जहाजांची तपासणी, मार्ग बदलण्याचे आदेश किंवा जहाजे जप्त करण्याची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे, इराणने आपल्या जहाजांना रोखल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या नौदलामध्ये थेट संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कतारच्या प्रतिनिधींनी इराणमध्ये चर्चा केल्याने राजनैतिक मार्गाने तणाव कमी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आता इराणचा तेलवाहू ताफा प्रत्यक्ष नाकेबंदीला आव्हान देतो का आणि अमेरिका त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.






