वाहतूक कोंडीचा ‘द एंड’! लवकरच ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
Pune Metro: शहराचे सौंदर्य जपण्यासाठी ओव्हरहेड तारांऐवजी ‘७५० व्ही डीसी थर्ड-रेल’ यंत्रणा आणि अचूक वेळेसाठी ‘सीबीटीसी’ सिग्नलिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.
मेट्रो लाईन-३’ चा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज
पिंपरी/Pune Metro: रोजची अंगाची लाहीलाही करणारी वाहतूक कोंडी, वाकड-बाणेर पट्ट्यातील (Pune Metro) विस्कळीत वाहतूक आणि हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पोहोचताना होणारा मनस्ताप… या सगळ्या त्रासातून लाखो पुणेकर आणि आयटी अभियंत्यांची लवकरच कायमची सुटका होणार आहे. बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेमेट्रो लाईन-३’ चा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे ऑनलाईन लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रशासकीय पातळीवर पीएमआरडीए आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि.’ (पीआयटीसीएमआरएल) कडून तयारीचा वेग वाढवण्यात आला आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आणि तांत्रिक बाजू
प्रकल्पाचे स्वरूप: २३.३ किलोमीटरचा हा संपूर्ण उन्नत मार्ग असून यावर एकूण २३ स्थानके आहेत.
दोन टप्प्यांत सुरुवात: पहिल्या टप्प्यात माण (हिंजवडी) ते बालेवाडी या १२ स्थानकांदरम्यान गाड्या धावतील. तर दुसऱ्या टप्प्यात बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर मार्ग खुला होईल.
सीएमआरएस मंजुरी: मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलै रोजी सुरक्षेचा हिरवा कंदील दिला असून ताशी ८० किमी वेगाने गाडी चालवण्यास मान्यता मिळाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान: शहराचे सौंदर्य जपण्यासाठी ओव्हरहेड तारांऐवजी ‘७५० व्ही डीसी थर्ड-रेल’ यंत्रणा आणि अचूक वेळेसाठी ‘सीबीटीसी’ सिग्नलिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.
हरित उपक्रम: एकूण विजेच्या गरजेपैकी एक-तृतीयांश वीज स्थानकांवरील रूफटॉप सोलर पॅनेल्सद्वारे निर्माण केली जाणार आहे.
पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचा आदर्श पॅटर्न
केंद्र सरकारच्या ‘न्यू मेट्रो पॉलिसी २०१७’ अंतर्गत उभारला जाणारा हा देशातील महत्त्वाचा ‘पीपीपी’ प्रकल्प आहे. पीएमआरडीएने ‘डीबीएफओटी’ तत्त्वावर ३५ वर्षांसाठी टाटा समूह व सीमेन्स यांच्या संयुक्त ‘पीआयटीसीएमआरएल’ कंपनीकडे याचे दायित्व सोपवले आहे. अल्स्टॉम कंपनीचे आधुनिक डबे आणि माण येथील अद्ययावत डेपो या प्रकल्पाची तांत्रिक ताकद वाढवतात.
वाहतूक कोंडीवर मात आणि त्रिवेणी संगम
हिंजवडी ते शिवाजीनगर ही लाईन ३ पुणे मेट्रोच्या आधीच्या लाईन १ आणि २ शी जोडली जाणार (Interchange) आहे. यामुळे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, एसटी डेपो आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. विद्यापीठ चौक, बाणेर आणि वाकड परिसरातील रस्त्यांवरचा ताण यामुळे लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
“हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांचा हा प्रवास सुरू होण्याची पूर्ण शक्यता आहे.”
— डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
Web Title: Pune hinjawadi shivajinagar metro line 3 is likely operational soon inaugurated by pm narendra modi