1. ‘आपली मेट्रो’ बनली पुणेकरांची पसंती
2. साडेतीन वर्षांत गाठला १० कोटी प्रवाशांचा टप्पा
३. पुणे मेट्रो ठरली वाहतूक कोंडीला पर्याय
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी सार्वजनिक वाहतुकीत नवे पर्व सुरू करणाऱ्या पुणे मेट्रोने अवघ्या साडेतीन वर्षांत १० कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय ठरलेल्या आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मेट्रोच्या या यशस्वी प्रवासाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना नवी ओळख मिळवून दिली आहे.
टप्प्याटप्प्याने विस्तार
पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्याने झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्याने मोठी वाढ झाली आहे. ६ मार्च २०२२ रोजी पहिला टप्पा पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय पंतप्रधान यांच्या हस्ते सुरू झाली. अंदाजे त्यावेळी २०ते ३० हजार दैनंदिन प्रवासी संख्या होती. त्यानंतर १ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण विस्तारामध्ये फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक दैनंदिन प्रवाशांचा आकडा १ लाख १० हजारापर्यत पोहोचला. त्यानंतर ६ मार्च २०२४ रोजी पूर्व-पश्चिम कॉरिडोरची पूर्णता रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी झाल्यावर ही संख्या १ लाख ३० हजार झाली. २९ सप्टेंबर २०२४ रोजी भूमिगत मार्गाची पूर्णता जिल्हा न्यायालय ते स्वारगेट झाल्यावर अंदाजित १ लाख ६० हजार ते २ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करण्यास सुरुवात केली.
Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?
१० कोटी प्रवाशांचा टप्पा पूर्ण
पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडून केवळ एक आकडेवारी पूर्ण केलेली नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या भविष्यातील विकासाची पायाभरणी केली आहे. जलद वाहतुकीमुळे व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोपे होऊन आर्थिक चालना मिळत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारे उत्तम साधन असल्याने पुणे शहर अधिक हरित होण्यास मदत होईल. तसेच, उर्वरित फेज-१ चे विस्तार आणि प्रस्तावित फेज-२ मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. पुणे मेट्रोचे हे यश महामेट्रोचे अभियंते, कर्मचारी आणि प्रशासनाचे परिश्रम तसेच पुणेकरांच्या सहकार्याचे प्रतीक आहे..
“पुणे मेट्रो ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर पुणेकरांची ‘आपली मेट्रो’ बनली आहे,” या १० कोटी प्रवाशांमध्ये प्रत्येक पुणेकराचा विश्वास आणि सहभाग आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून, भविष्यात आम्ही उर्वरित टप्पे पूर्ण करून आणि अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.या अभूतपूर्व यशाबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचे आभार.
श्रावण हर्डीकर,
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
खास गोष्टी
२०२२ मध्ये मेट्रोची संख्या ०३ होती.
२०२५ मध्ये मेट्रोची संख्या ३३ झाली.
नवीन १२ ट्रेन लवकरच दाखल होणार आहेत.
२०२२ मध्ये १३ मिनिटाला एक मेट्रो धावत होती.
२०२४ मध्ये ७ मिनिटाला धावू लागली.
मेट्रो २०२४ मध्ये पुणे मेट्रोचे दोन्ही मार्गिका मिळून दिवसाला ४९० फेऱ्याद्वारे सेवा सुरू होत्या.
२०२५ मध्ये गर्दीच्या वेळी ६ मिनिटाला धावू लागली.
दर ६ मिनिटाला ट्रेन सुरू झाल्यामुळे ६४ फेऱ्या वाढल्या आहेत.
आता एकून ५५४ फेऱ्या दिवसाला होतात.
मेट्रोची एकूण कर्मचारी संख्या ३८५ आहे.
लोको पायलट पुरूष संख्या १२३ आहे.
लोको पायलट महिला ०९ आहेत.
आर्थिक वर्ष एकूण प्रवासीसंख्या
२०२१-२०२२ (मार्च २०२२ पासून) ५,१४,२१८
२०२२-२०२३ १३,३७,५४८
२०२३-२०२४ १,४९,३५,३७९
२०२४-२०२५ ४,६९,७९,९६५
२०२५-२०२६ (४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत )३,५९,५४,१५१