
पुणे गणेशोत्सव 2026
रविवार पेठेतील श्री साईनाथ सत्यनारायण मंदिराजवळील उदय मंडळ ट्रस्टने ‘हॉरर जंगल’ ही संकल्पना साकारली आहे. विशेषतः लहान मुलांसाठी हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष विलास कथलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल साळुंखे, युवराज जगताप, स्वप्नील सावंत, मयूर साळुंखे, राजेंद्र गिडीतकर, सुरेश वैद्य, अतुल केकाण, अंकुश लातूरकर आदी कार्यकर्ते सहभागी आहेत. देखाव्याची सजावट सोमनाथ खोपडे व अथर्व खोपडे यांनी केली आहे.
आदर्श सेवा मंडळ ट्रस्टने ‘दख्खनचा राजा जोतिबा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष शैलेश बढाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यासाठी खर्च होणाऱ्या निधीतून वर्षभर सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जातात.
श्री अखिल कपडगंज गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने काल्पनिक देखावा सादर केला आहे. अध्यक्ष किसन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. सहकार तरुण मंडळानेही काल्पनिक देखाव्याची निर्मिती केली असून अध्यक्ष भाऊसाहेब करपे यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
‘बाप्पा, तू माझ्याच हातांनी घडलास!’; गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये अनुभवायला मिळतोय भक्तीचा खरा आनंद
श्री सुंदर गणपती तरुण मंडळाने ‘वडसिद्ध नागनाथ’ हा हालता देखावा सादर केला आहे. अध्यक्ष अनिकेत गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांकडून आरोग्य शिबिर, रक्तदान यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या श्री शिवाजी मराठा मंडळ ट्रस्टने ‘पंचगंगा शिव मंदिर’ हा आकर्षक देखावा साकारला आहे. कस्तुरे चौक तरुण मंडळाने ‘गरुडारूढ विघ्नहर्ता गणेश’ हा देखावा तयार केला असून शहराच्या पूर्व भागातील उंच गणेशमूर्तींपैकी एक अशी या मंडळाची ओळख आहे.
गुरुवार पेठेतील झुंजार मित्र मंडळाने ‘शिवमहिमा’ हा आकर्षक देखावा साकारला आहे. श्री मंगल क्लब मित्र मंडळाने ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मंडळाने ‘स्वर्गलोक-नरकलोक’ हा देखावा सादर केला आहे. विविध धार्मिक व पौराणिक प्रसंगांमुळे या भागातील देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
गणेश पेठेत सामाजिक संदेशासह देखावे
गणेश पेठेतील मंडळांनी देखाव्यांमधून मनोरंजनासोबतच सामाजिक विषयांनाही स्थान दिले आहे. श्री कृष्ण तरुण मंडळाने काल्पनिक देखावा सादर केला असून अध्यक्ष अजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. श्री शिवांजली मंडळाने ‘गणेश महाल’ हा आकर्षक देखावा साकारला आहे.
बुधवार पेठेतील नातू चाळीमधील जिजामाता तरुण मंडळाने ‘तुंबाड’ या भयपटावर आधारित देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश गंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करण्यात आला आहे.
मित्र मंडळाने ‘संत तुकाराम वैकुंठगमन’ हा देखावा साकारला आहे. झुंजार मित्र मंडळाने ‘शिवमहिमा’ हा देखावा तयार केला आहे. अध्यक्ष विनायक मोरे, सचिन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जातात. खडक पोलिस लाइन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘नाथद्वार’ हा देखावा सादर केला आहे.
Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
शुक्रवार पेठेतील श्री लाकडी गणपती मंडळाने ‘अष्टविनायक महाल’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष राजवीर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात.
घोरपडे पेठेत पौराणिक ते काल्पनिक देखावे
घोरपडे पेठेतील श्रीमंत एकता तरुण मंडळाने काल्पनिक देखावा सादर केला आहे. नेहरू मित्र मंडळाने ‘भूत बंगला’ हा देखावा तयार केला आहे. श्रीमंत सुवर्ण भारत मित्र मंडळाने ‘ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ जन्म’ हा देखावा साकारला आहे. खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘बालाजी मंदिर’ हा भव्य देखावा सादर केला आहे. बालवीर मित्र मंडळाने ‘साईबाबा भंडारा-सबका मालिक एक है’ हा देखावा तयार केला आहे. जय हनुमान मित्र मंडळाने ‘चाळीतील गणपती’ हा देखावा सादर केला आहे.
मामलेदार कचेरी परिसरातील श्री शिवाजी चौक मित्र मंडळाने ‘आजचे आम्ही, उद्याचे तुम्ही’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. वृद्ध नागरिक आणि वृद्धाश्रम या विषयावर आधारित या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. अध्यक्ष विजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांकडून विविध समाजोपयोगी कामे केली जातात.