
पुणे गणेशोत्सव 2026
‘नवराष्ट्र’ विशेषमध्ये मुकुंद दातार यांची कहाणी
अनेक वस्तूंमधून गणपतीची विविध रूपे साकारली
२००५ मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज २०२६ मध्येही अखंडपणे सुरू
पुणे/Ganeshotsav: ‘देव आपल्या आसपासच असतो’ असे म्हणतात. मात्र, हा देव नेमका कुठे दिसतो, याचा शोध घेताना कमर्शिअल आर्टिस्ट मुकुंद दातार यांना तो सर्वप्रथम घरातील भांड्यांमध्ये दिसला. साध्या भांड्यांना कलात्मक रूप देत त्यांनी गणपती बाप्पा साकारला आणि त्यातून सुरू झाला रोजच्या वापरातील वस्तूंमध्ये गणराय शोधण्याचा अनोखा कलाप्रवास.
२००५ मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज २०२६ मध्येही अखंडपणे सुरू आहे. गेल्या (Pune) दोन दशकांत दातार यांनी आपल्या आजूबाजूला सहज दिसणाऱ्या अनेक वस्तूंमधून गणपतीची विविध रूपे साकारली आहेत. कधी भाजीपाला, कधी सायकल, तर कधी वाद्ये, शैक्षणिक साहित्य, गाडीचे पार्ट, बांधकाम साहित्य अशा वेगवेगळ्या वस्तूंमध्ये त्यांनी गणरायाचे रूप शोधले.
‘आपल्या आसपासच असणाऱ्या वस्तूंमध्येही देवत्व आणि सौंदर्य शोधता येते,’ या विचारातून त्यांच्या या कलाकृतींची निर्मिती होते. एखादी वस्तू केवळ वापराची आहे, असे न पाहता तिच्याकडे कलात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातून काहीतरी वेगळे साकारता येऊ शकते, हे त्यांच्या प्रयोगातून दिसून येते.
यंदाच्या गणेशोत्सवात दातार यांनी या प्रयोगाला आणखी एक वेगळे वळण देत वर्तमानपत्राचा वापर करून गणपती बाप्पा साकारला आहे. दररोज हातात येणारे वर्तमानपत्र बातम्यांचे माध्यम असले, तरी त्याच कागदाला कलात्मक आकार देत त्यांनी त्यातून गणरायाची मूर्ती साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या दोन दशकांच्या कलाप्रवासातील यंदाचा प्रयोग विशेष ठरला आहे.
मुकुंद दातार हे कमर्शिअल आर्टिस्ट असून, कलानिर्मितीसोबतच ते लहान मुले आणि मोठ्यांसाठी दरवर्षी शाडूच्या मातीपासून गणपतीमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळाही आयोजित करतात. या कार्यशाळांच्या माध्यमातून गणेशमूर्ती घडविण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करतात. भांड्यांपासून सुरू झालेला बाप्पाचा शोध आता वर्तमानपत्रापर्यंत पोहोचला आहे. रोजच्या वस्तूंमध्ये दडलेले गणरायाचे वेगळे रूप शोधत मुकुंद दातार यांचा हा कलाप्रवास आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे सोमवारी थाटात आगमन झाले. आगमन मिरवणुकांनंतर ठरलेल्या वेळेनुसार प्राणप्रतिष्ठापना सोहळे पार पडले. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिवसभर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.