Pune Metro: गणेशोत्सवातील वाढती गर्दी पाहता मध्यवर्ती पुण्यात पोहोचण्यासाठी मेट्रोचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मेट्रोची सेवा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
पुणे मेट्रोचा महसूल वाढला (फोटो- सोशल मिडिया)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासीसंख्येला ‘वेग’
चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ
महसुलातही १८.४१ लाखांची भर
पुणे/Pune Metro: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील गर्दी वाढत असताना, उपनगरांतून शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचण्यासाठी पुणेकरांकडून मेट्रोला मोठी पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असून, अवघ्या चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. याचा परिणाम मेट्रोच्या दैनंदिन महसुलावरही झाला आहे.
वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन्ही मार्गांवर १४ सप्टेंबर रोजी एकूण २ लाख ६२ हजार ६७१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ झाली. १५ सप्टेंबरला २ लाख ८७ हजार ९००, १६ सप्टेंबरला ३ लाख १९ हजार ९१५, तर १७ सप्टेंबरला तब्बल ३ लाख ७२ हजार ८३२ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
गणेशोत्सवात शहरातील प्रमुख गणेश मंडळे, देखावे आणि बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. उपनगरांमध्ये वाहने पार्क करून कुटुंबासह मध्यवर्ती पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने मेट्रोच्या प्रवासीसंख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी मेट्रो प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी पाहता मध्यवर्ती पुण्यात पोहोचण्यासाठी मेट्रोचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मेट्रोची सेवा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील अनेक देखावे रात्री बारापर्यंत सुरू राहणार असल्याने पुढील काही दिवसांत प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता असून, त्यानुसार मेट्रो प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
प्रवासीसंख्येबरोबरच मेट्रोच्या महसुलातही वाढ झाली आहे. १४ सप्टेंबर रोजी दोन्ही मार्गांवरून ४३ लाख १९ हजार ७०७ रुपयांचा महसूल मिळाला होता. १७ सप्टेंबरला हा महसूल वाढून ६१ लाख ६१ हजार १२३ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच चार दिवसांत दैनंदिन महसुलात सुमारे १८.४१ लाख रुपयांची वाढ झाली. १७ सप्टेंबर रोजी वनाज-रामवाडी मार्गावर १ लाख ९५ हजार २३१, तर पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर १ लाख ७७ हजार ६०१ प्रवाशांनी प्रवास केला.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Pune metro daily ridership increases by more than 110 lakh and 18 lakhs revenue ganpati festival 2026