
'काय बंधू...' या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
बारामती / अमोल तोरणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चुलत बंधू, बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी प्रथमच सोशल मीडियावर अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बालपणापासूनचा सहवास, एकत्र अनुभवलेले प्रसंग, राजकीय प्रवासातील चढ-उतार आणि अखेरच्या काळातील भावनिक जवळीक यांचा उल्लेख करताना राजेंद्र पवार यांनी अजितदादांना अत्यंत हळव्या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
२२ जुलै…आज तू ६७ वर्षे पूर्ण केली असतीस, म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान, अशा शब्दांत राजेंद्र पवार यांनी आपल्या भावनिक लेखाची सुरुवात केली आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी लिहिले आहे की, चार-पाच वर्षांचे असताना अजित पवार रात्री बारामतीत कंदील घेऊन पळत जात आणि अंधाराची भीती दाखवत. उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात रस्त्यावर लोळल्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या आहेत.
त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो; पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास, या आठवणीने अजितदादांच्या बालपणापासून ते मंत्रिपदापर्यंतच्या प्रवासाचा अनोखा धागा त्यांनी उलगडला आहे. शाळेचे प्रमाणपत्र आणण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर घाबरून घरी न जाता शाळा उघडेपर्यंत चौपाटीवर बसून राहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून “आपण असे कधी होणार?” असे म्हणणारे दोघे भाऊ; त्यापैकी अजितदादा पुढे मंत्री झाले, याची आठवण राजेंद्र पवार यांनी आवर्जून केली आहे.
तात्यासाहेबांचे पंचगंगेच्या घाटावर केलेले अस्थिविसर्जन, बंगळुरूहून ट्रकने गायी आणण्याचा प्रवास, पंचमीला काच लावून मांजा तयार करणे आणि पतंग उडविताना काटाकाटी करण्याची अजितदादांची हौस, अशा अनेक आठवणींमधून दोघा भावांमधील जिव्हाळ्याचे नाते त्यांनी उलगडले आहे.
अजितदादा मोठे झाले, मंत्री झाले; मात्र, त्यांच्या मनातील प्रेमाचा हळवा कोपरा त्यांनी कायम जपला, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे. आमदार रोहित पवार अवघे दोन महिन्यांचे असताना त्यांना सोबत घेऊन अजितदादांसोबत उटीला केलेला प्रवास आणि रोहित पवार यांच्या पहिल्या निवडणुकीत अजितदादांनी घेतलेली काळजी यांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. राजकीयदृष्ट्या दोन्ही कुटुंबे वेगवेगळ्या पक्षांत असली तरी अखेरच्या काळात रोहितसोबत पुन्हा एकत्र येऊन काम करण्याबाबत अजितदादा जवळिकीने बोलत होते, असेही राजेंद्र पवार यांनी नमूद केले आहे.
कृषिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अजितदादा घरी आले होते. त्यावेळी वहिनींच्या हातची आवडती भाजी आणि कवठ खाऊन त्यांनी नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाचे कौतुक केले. आवडले ते मनापासून बोलणारा तू, असे म्हणत राजेंद्र पवार यांनी अजितदादांच्या मनमोकळ्या स्वभावाची आठवण सांगितली आहे.
‘१९६४ च्या दरम्यान आपल्या चुलत्यांचे, वसंतदादांचे अपघाती निधन झाले, त्यावेळी पवार घराणे स्तब्ध झाले होते. तसेच आज तुझ्या जाण्याने झाले आहे’, असे म्हणत त्यांनी अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी व्यक्त केली आहे.
“तू नाहीस हे जरी सत्य असले तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो. मनापासून तुझी आठवण येतेय. तुझे अस्तित्व जाणवत राहते. ‘काय बंधू’ म्हणून तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहत राहील,” या शब्दांत राजेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध झालेल्या या भावनिक आठवणींमुळे पवार कुटुंबातील दोन भावांमधील जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये अजितदादांसोबतचे बालपणातील फोटो, तसेच आमदार रोहित पवार यांना लहानपणी मांडीवर घेतल्याचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.