
मंडळ कितीही मोठे असो, कर्णकर्कश डिजे वाजवलात तर...; पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा इशारा
बारामती : गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; मात्र कर्णकर्कश डीजे व ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नका. ध्वनीमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक, मालक व आयोजकांवर पुराव्याच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल. मंडळ कितीही मोठे असो अथवा प्रभावशाली असो, नियमभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिला आहे. आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील कविवर्य मोरोपंत हॉल येथे ३१ ऑगस्ट रोजी समन्वय व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, सुपा व माळेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे ३०० ते ४०० गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डीजे व ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर पोलीस अधीक्षक गिल यांनी कठोर भूमिका घेतली. “परवानगी घेतली म्हणजे अमर्याद आवाज करण्याची परवानगी मिळाली, असा गैरसमज करून घेऊ नका,” असे त्यांनी स्पष्ट केले. ध्वनीमर्यादांचे उल्लंघन होत असल्यास ध्वनीमापक यंत्राद्वारे प्रत्यक्ष आवाजाची नोंद घेण्यात येणार असून, नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अतितीव्र आवाजामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असल्याने मंडळांनी जबाबदारीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
“मोठा डीजे म्हणजे मोठा उत्सव नव्हे!”
गणेशोत्सवाची भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपताना आरती, भजन, अभंग, ढोल-ताशा, लेझीम तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. केवळ मोठ्या आवाजाला मंडळाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
मंडळांच्या समस्याही मार्गी लागणार
बैठकीत गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या, विद्युत तारा, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील अडथळे, वाहतूक नियोजन व मंडप व्यवस्थेबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या. संबंधित विभागांनी त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. मंडप, विद्युत व अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, गर्दी व्यवस्थापन तसेच विसर्जन मिरवणुकीतील शिस्त याबाबतही सूचना देण्यात आल्या.