
Shivsena Nana Bhangire opposed bogus voting in Mahadev Wadi Undri Ward Number 41 pmc election 2026
मिळालेल्या माहितीनुसार, नाना भानगिरे यांनी काही मतदार बोगस असल्याचा संशय व्यक्त करत त्यांना थांबवले. संबंधित मतदारांनी मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना चौकशीसाठी थेट काळेपडळ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. मात्र, पोलिस चौकशीत एक वेगळेच चित्र समोर आले. संबंधित मतदारांची नावे अधिकृत मतदान यादीत असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले असून, याच आधारे त्यांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काळेपडळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांकडून बोगस मतदान झाल्याची कोणतीही अधिकृत तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, संबंधित मतदारांची ओळखपत्रे, विशेषतः आधार कार्ड व इतर कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाने सावध भूमिका घेतली असली, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना मात्र उधाण आले आहे. शिवसेनेकडून बोगस मतदानाचा गंभीर आरोप केला जात असताना, प्रशासन मात्र नियमांच्या चौकटीतच कारवाई होईल, अशी भूमिका घेत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बोगस मतदान झाल्याची अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तोपर्यंत संशयित मतदारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
हे देखील वाचा : मतदानापेक्षा मशीनच चर्चेत! PMC निवडणुकीत EVMच्या बिघाडाने लोकशाहीचा खेळखंडोबा”
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक काळात अशा प्रकारच्या आरोपांमुळे वातावरण तापते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. बोगस मतदानासारखा गंभीर आरोप केवळ राजकीय दबावातून नव्हे, तर ठोस पुराव्यांच्या आधारेच पुढे नेणे आवश्यक असते. अन्यथा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका असतो. या संदर्भात नाना भानगिरेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.