
Saswad News: 'मुलींची छेडछाड होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांवर...'; SP पंकज देशमुख यांच्या अधिकाऱ्यांना काय सूचना? पहाच
सासवड: सासवडमधील दत्तनगर आणि परिसरात बेकायदेशीरपणे सुरु असलेले मटका, जुगार तेच गांजा, चरस, अफू विक्रीचे धंदे तातडीने बंद करावेत. आजपासूनच बेकायदेशीर व्यवसायांवर धाडी टाकून त्यांच्यवर गुन्हे दाखल करावेत. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यावसायिकांकडे बेकायदेशीर वास्तव्य करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांची माहिती संकलित करावी. महिला मुलींची छेडछाड होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांवर निर्भया पथकाद्वारे कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशा सक्त सूचना जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी वार्षिक दप्तर तपासणीच्या निमित्ताने सासवड पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधला. आगामी काळातील रमजान ईद, गुढी पाडवा, तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जातीय सलोखा राखावा, कोणतेही वाद विवाद उत्पन्न न होता शांतता राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी संघटनाच्या प्रतिनिधीना केले आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सासवडमधील दत्त्नानगर परिसरात बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून येथे नियमित भांडणे, मारामारी असे प्रकार नियमित होत असून या व्यवसायांना आळा घालण्याची मागणी पत्रकारांनी केली असता पंकज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या. एखाद्या परिसरात तक्रार करूनही कारवाई होत नसेल तर पोलिसच त्यांना अभय देतात अशी भावना निर्माण होते आणि ते सर्वांसाठी घातक आहे. त्यामुळे तिथे दररोज धाडी टाका आणि पूर्ण धंदे बंद करून मला कारवाईची माहिती पाठवा असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान सासवड आणि तालुक्याचे शहरीकरण झपाट्याने वाढत असून गुन्हेगार वृत्तीचे लोक इतरत्र गुन्हे करून पुरंदर तालुक्यात आश्रयास येत आहेत, तालुक्यात घड्फोडी, मोठी भांडणे, चोरीचे प्रमाण वाढत असून तालुक्यातील घाटमाथे तसेच प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी कमी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना सध्या ५७ कर्मचारी असून आणखी १७ कर्मचारी देण्यात येणार असल्याने काही दिवसांत ७० कर्मचारी राहतील. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा बाबत कारवाही करण्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले.
सासवड पोलिसांची धडक कारवाई; सायलेन्सरचा आवाज काढणाऱ्यांच्या पुंगळ्या केल्या टाईट
सासवड मधील शाळा, कॉलेजचा परिसर, एसटी, पीएमटी बसस्थानक परिसरात शाळा सुरु होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक नियमित पेट्रोलिंग करील. तसेच टवाळखोरी करणाऱ्या व्यक्तींना चोप देवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
कमी पगारात कामगार मिळतात म्हणून गुन्हेगारांना पोसणार का ?
सासवड आणि परिसरात हजारो परप्रांतीय कामगार राहत असून त्यापैकी अनेकांवर गुन्हे दाखल आहेत अनेक गुन्हेगार विविध व्यावसायिकांकडे कार्यरत असून त्यांना त्यामाध्यमातून संरक्षण मिळत आहे. याबाबत बोलताना पंकज देशमुख यांनी सांगितले कि, ज्या लोकांकडे परप्रांतीय कामगार आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, पोलिसांनी आठ दिवसांत सर्व माहिती गोळा करावी, जे लोक माहिती देणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्याच बरोबर तुम्हाला कमी पगारात कामगार मिळतात म्हणून गुन्हेगारांना पोसणार का ? असा प्रश्न उपस्थित करीत असे गुन्हेगार आढळल्यास संबंधित घर मालक किंवा व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.