
दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
देऊळगाव राजे : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता हुमणी किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाचे नवे संकट उभे राहिले आहे. पाण्याअभावी ऊसाची वाढ खुंटलेली असतानाच किडीमुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्यावर ऊस पीक जगविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतानाच हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हुमणीच्या अळ्या ऊसाच्या मुळांवर उपजीविका करीत असल्याने बाधित क्षेत्रातील ऊस पिवळा पडणे, वाढ खुंटणे आणि काही ठिकाणी ऊस वाळण्याचे प्रकारही दिसून येत आहेत.
उपायांवर होतोय अतिरिक्त खर्च
एकीकडे सिंचनासाठी होणारा वाढता खर्च, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती आणि दुसरीकडे उत्पादनाबाबतची अनिश्चितता यामुळे ऊस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. हुमणी नियंत्रणासाठी औषधोपचार व इतर उपाययोजनांवर अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने उत्पादन खर्चाचा बोजाही वाढत आहे.
पंचनाम्यात ऊस पिकाचा समावेश करा
दुष्काळी परिस्थितीचा ऊस पिकावर मोठा परिणाम होत असतानाही दुष्काळी मदतीच्या निकषांमध्ये ऊस पिकाचा पुरेसा समावेश होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ पंचनाम्यांमध्ये ऊस पिकाचा समावेश करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
औषधांसह तांत्रिक मार्गदर्शन करा
हुमणीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच ऊस उत्पादकांना दुष्काळी मदत आणि हुमणी नियंत्रणासाठी आवश्यक औषधे, अनुदान व कृषी विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
“दरवर्षीच्या तुलनेत यंदा हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता असून, याचा आर्थिक फटका यंदा मोठ्या प्रमाणात बसणार आहे. ऊस पिकासाठी घेतलेले कर्जदेखील उत्पादनातून फेडणे अवघड होण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ पंचनाम्यांमध्ये ऊस पिकाचा समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” – तुळशीदास बुऱ्हाडे, शेतकरी, देऊळगाव राजे.