
राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
पुणे : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होताच महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मुंबईत सोमवारी कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले. मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागांत उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातही तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. रविवारी शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान ३४.८ अंश, तर लोहगावमध्ये ३५.४ अंश नोंदले गेले. पुढील काही दिवस पुण्यात तापमान ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही सोमवारी कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मालेगावात रविवारी राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, मुंबईत कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज असून, पुढील काही दिवसही उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा संपताच महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
तापमान आणखी वाढण्याची शक्यता
मान्सूनच्या माघारीनंतर आकाश निरभ्र होणे, पावसाचा अभाव आणि वाढलेले ऊन यामुळे दिवसाचे तापमान वाढते. त्यात मुंबई आणि कोकणात दमटपणाची भर पडत असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाडा अधिक जाणवतो. हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
जळगावात 37.5 अंशांवर तापमान
मागील दोन-तीन दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात सोमवारी काहीशी घट होऊन तापमान ३२ ते ३४ अशांवर नोंदले गेले. तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे सोमवारी ३७.५ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, जे सरासरी कमाल तापमानाहून ५.९ अंशांनी अधिक होते.
उकाडा आणखी वाढण्याचा अंदाज
सोलापूर येथे ३७.४, परभणी ३५.७, तर सातारा येथे ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुढील काही दिवसात उकाडा आणखी वाढण्याचा अंदाज असून, आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागरिकांना उन्हाचा ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता