
देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
देहू : पवित्र तीर्थक्षेत्र देहू नगरीतील कचरा डेपोवरील अयोग्य व्यवस्थापन आणि कचरा जाळण्याच्या प्रकाराविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कचरा डेपोच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना लेखी निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या देहू नगरीत गेल्या काही काळापासून कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे भाजपने निवेदनात म्हटले आहे. कचरा डेपोवर कचरा जाळला जात असल्याने दुर्गंधीयुक्त धूर परिसरात पसरत असून, त्यामुळे वायुप्रदूषण वाढत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, विशेषतः लहान मुले व वृद्धांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा भाजपने केला आहे.
कचरा डेपोला कंपाऊंड नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
देहू नगरपंचायत हद्दीबाहेरील कचराही या डेपोवर आणून टाकला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच कचरा डेपोला पूर्ण कंपाऊंड नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे कचरा खाण्यासाठी डेपोमध्ये जातात. दलदलीत जनावरे अडकण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भाजपच्या प्रमुख मागण्या
कचरा डेपोवर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावा, देहू नगरपंचायत हद्दीबाहेरील कचऱ्याच्या गाड्यांना डेपोमध्ये प्रवेश बंद करावा, परिसरात चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कचरा जाळणे तातडीने बंद करून शास्त्रोक्त पद्धतीने कचरा व्यवस्थापन करावे आणि डेपोला संपूर्ण कंपाऊंड करावे, अशा मागण्या भाजपने केल्या आहेत. तसेच कचरा डेपो मुख्य रस्त्यापासून तसेच निवासी क्षेत्रापासून किमान एक हजार मीटर अंतरावर असावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
‘…तर नगरपंचायत कार्यालयासमोर कचरा जाळणार’
या सर्व परिस्थितीला देहू नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, या कालावधीत ठोस सुधारणा न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर कचरा आणून जाळण्यात येईल, तसेच कचरा डेपोवर येणाऱ्या गाड्या अडवून एकही गाडी रिकामी करू दिली जाणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.