सौजन्य - एआय
चाकण : चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या परिसरात वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात चाकण व महाळुंगे वाहतूक पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव मार्ग, शिक्रापूर मार्ग यांसह एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
चाकण शहरातील प्रमुख चौक, मुख्य बाजारपेठा आणि प्रचंड वर्दळीच्या ठिकाणांवर वाहतूक पोलिसांकडून विशेष पाळत ठेवली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील कारणांसाठी गुन्हे नोंदवून दंड आकारण्यात येत आहे.
प्रमुख चौकांत विशेष तपासणी मोहीम
विनापरवाना वाहने चालविणे
‘नो पार्किंग’ क्षेत्रात बेशिस्तपणे वाहने उभी करणे
हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर टाळणे
वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे
वाहनांची वैध कागदपत्रे सोबत न बाळगणे
फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणे आणि सिग्नल तोडणे
दीड महिन्यात तब्बल १ कोटी ३४ लाखांचा दंड वसूल
महाळुंगे वाहतूक विभागाने १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत धडक कारवाई करत तब्बल ९,७७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल १,३४,५९,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच त्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत समजही दिली जात आहे.
तळेगाव चौकात २० रिक्षांवर जप्तीची कारवाई
पुणे-नाशिक महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तळेगाव चौक परिसरात वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने अनधिकृतपणे उभ्या केलेल्या सुमारे २० रिक्षांवर चाकण वाहतूक विभागाने कारवाई केली. या सर्व रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, संबंधित चालकांवर विविध वाहतूक कलमांनुसार गुन्हे दाखल करून दंड आकारला जाणार असल्याचे चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी सांगितले. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तारामुळे चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट, चारचाकी चालवताना सीट बेल्ट, वाहनांची सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे आणि रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त न लावणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाळुंगे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे व चाकणचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी केले आहे.






