
पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा पर्याय समोर
पुणे महापालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली. त्यानंतर १९६६ मध्ये सध्याच्या मनपा मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. प्रशासनिक आणि राजकीय कामकाजाचा विस्तार झाल्यानंतर २०१५ मध्ये लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ही इमारत २०१८ मध्ये वापरासाठी उपलब्ध झाली. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका व अन्य कामकाजासाठी स्वतंत्र व्यवस्था झाली. मात्र मनपाच्या विविध प्रशासकीय विभागांसाठी जागेची समस्या कायम आहे.
मालमत्ता कर निर्धारण व वसुली, शिक्षण मंडळ, स्थानिक संस्था कर (एलबीटी), आरोग्य विभाग यांसह अनेक विभाग सध्या वेगवेगळ्या इमारतींमधून कार्यरत आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठका, समन्वय आणि प्रशासकीय कामांसाठी विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी मनपाचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नव्या प्रशासकीय मुख्यालयाची संकल्पना मांडली आहे.
शिवाजी आखाड्याच्या जागेवर नजर
शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर नवे प्रशासकीय केंद्र उभारण्याबाबत विचार सुरू आहे. ही जागा मनपाच्या मालकीची असून ती दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. शिवाजी आखाड्याचे बालेवाडी परिसरात स्थलांतर करण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर प्रस्ताव पुढे नेण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व विभाग एकाच परिसरात
प्रस्तावित प्रशासकीय इमारतीमध्ये मनपाचे विविध विभाग एकाच ठिकाणी आणण्याची योजना आहे. त्यामुळे विभागांमधील समन्वय वाढण्यासोबतच प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑनलाइन बैठकींची कक्षे, विविध समित्यांसाठी मोठी सभागृहे तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि अन्य कामांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. नागरिकांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि मनपाचे प्रशासन अधिक सुलभ व गतिमान व्हावे, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे.
शिवाजी आखाड्याचे बालेवाडी येथे स्थलांतर, जागेचा ताबा, नव्या इमारतीचा आराखडा तसेच प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता या बाबींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या प्रस्तावाचे सविस्तर सादरीकरण मनपा पदाधिकारी आणि आयुक्तांसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्पाची पुढील प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. — अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे मनपा.
Ans: शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर सुमारे अडीच एकर क्षेत्रात स्वतंत्र आणि अत्याधुनिक प्रशासकीय मुख्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे.
Ans: महापालिकेच्या हद्दीत ३२ नव्या गावांचा समावेश झाल्याने लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाज वाढले आहे. विविध विभाग वेगवेगळ्या इमारतींमध्ये असल्याने समन्वयाच्या अडचणी निर्माण होत आहेत.
Ans: सर्व प्रशासकीय विभाग एकाच ठिकाणी आणण्यासह ऑनलाइन बैठकींचे कक्ष, मोठी सभागृहे आणि नागरिकांच्या तक्रारी व कामांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.