
पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा तब्बल ३० ते ३२ तासांचा कालावधी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनाच यंदा विशेष बाब म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून मंडळांच्या सहभागाबाबत कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली.
मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई करणाऱ्या नोटिसा पोलिसांनी सुमारे १५० मंडळांना बजावल्या होत्या. नंतर या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पोलिस आयुक्तांची भेट घेत निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुख्य मिरवणूक मार्गावर सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या बैठकीला सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, संजय बन्सोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नव्या मंडळांना मुख्य मार्गावर ‘नो एंट्री’
कोरोनानंतर चतुःशृंगी आणि शिवाजीनगर परिसरातील काही गणेश मंडळांना केळकर आणि कुमठेकर रस्त्यांवरून मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गांवरील वाढती गर्दी आणि मिरवणुकीचा वाढणारा कालावधी लक्षात घेऊन यंदा नव्या मंडळांना मुख्य मार्गावर सहभागी करून न घेण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यानुसार गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून केळकर आणि कुमठेकर रस्त्यांवरून सहभागी होता येणार आहे. याशिवाय संबंधित मार्गांवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांकडून अर्ज मागविण्यात आले असून, त्यानुसार परवानगी देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
महोत्सवी वर्ष असलेल्या मंडळांना दिलासा
ज्या गणेश मंडळांचे यंदा महोत्सवी वर्ष आहे, अशा मंडळांनाही मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच मध्यवर्ती पेठ भागातील गेल्या वर्षी किंवा यंदा प्रथमच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा केळकर रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होता येणार असल्याचे पोलिस आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.
‘अवघ्या पाच दिवस आधी निर्णय का?’
पोलिसांच्या निर्णयामुळे परवानगी नाकारण्यात आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व मंडळांना मुख्य मिरवणूक मार्गावर सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना असा निर्णय घेतल्याने मंडळांनी तयारी केली असतानाच त्यांच्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे कोणत्याही मंडळाची परवानगी नाकारू नये, अशी भूमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर मांडली.
गेल्या वर्षी ३२ तास २६ मिनिटे मिरवणूक ! ६०४ गणेश मंडळे सहभागी होते.
टिळक रस्ता – २३७ मंडळे
लक्ष्मी रस्ता – २६६ मंडळे
केळकर रस्ता – ७९ मंडळे
कुमठेकर रस्ता – २२ मंडळे
एकूण – ६०४ मंडळे
कोरोना पश्चात काळात मागील दोन किंवा तीन वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळालेल्या गणेश मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून पुन्हा मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून या मंडळांच्या सहभागाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. – अमितेश कुमार, पोलिस आयुक्त.